Aishwarya Narkar Recipe : ‘दुहेरी’, ‘या सुखांनो या’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वामिनी’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमुळे ऐश्वर्या नारकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. २५ वर्षांहून अधिक काळ त्या मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.

ऐश्वर्या नारकरांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत त्या नेहमीच फिटनेसवर देखील लक्ष देतात. योगा, घरचं जेवण, पौष्टिक पदार्थांचं सेवन यामुळे आपण फिट राहतो असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. यामुळेच अभिनेत्री वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही फिट अँड फाइन आहेत. सध्या त्या कोकणात गेल्या आहेत.

ऐश्वर्या नारकरांनी कोकणात जाऊन एक खास पारंपरिक पदार्थ बनवला आहे. कोकणात सध्या आंबे, फणस आणि काजूचा सीझन चालू आहे. यामुळे अभिनेत्रीने चाहत्यांना एका खास पदार्थाची रेसिपी दाखवली आहे.

ऐश्वर्या नारकरांनी गावी जाऊन काजूच्या बोंडूचं भरीत बनवलं आहे. काजूचे बोंडू शिजवून त्याला स्मॅश करायचं. यानंतर त्यात मीठ, मिरची आणि दही घालायचं आणि वरून जिऱ्याची फोडणी द्यायची अशी साधी-सोपी आणि आरोग्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी अभिनेत्रीने चाहत्यांना बनवून दाखवली आहे. ऐश्वर्या नारकरांनी काजूच्या बोंडूचं भरीत हा पदार्थ बनवण्याची सविस्तर प्रक्रिया युट्यूब व्हिडीओ शेअर करत दाखवली आहे.

नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पाककौशल्याचं भरभरून कौतुक केलं आहे. “ऐश्वर्या किती सुंदर”, “खूप छान भाजी… आम्ही पण ट्राय करू”, “रूचकर मेजवानी आपली serial आठवली दूरदर्शनवरील…”, “तोंडाला पाणी सुटलं”, “मॅम तुम्ही सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये जायला पाहिजे”, “ताई तुमची जुनी मालिका आठवली”, “खूप छान आयुष्य जगत आहात तुम्ही मॅडम” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये त्यांनी रुपाली हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. आता ऐश्वर्या नारकर पुन्हा एकदा कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत.