सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरच्या चर्चा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटापासून सुरू झाल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा त्यावेळी सलमान-ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये वाद निर्माण होऊन हे रिलेशनशिप संपुष्टात आलं.
सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यावर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय एकमेकांना डेट करू लागले अशा चर्चा सर्वत्र होत्या. “सलमानने बॉलीवूडमधून बाजूला केलं, हिट चित्रपट देऊनही कोणी काम दिलं नव्हतं.” असे अनेक आरोप विवेकने काही वर्षांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना केले होते. मात्र, अलीकडेच ज्येष्ठ लेखक व सिनेपत्रकार हनिफ झवेरी यांनी ‘मेरी सहेली’ला दिलेल्या मुलाखतीत, ऐश्वर्या व विवेक कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते असं वक्तव्य केलं आहे.
झवेरी याबद्दल सांगतात, “ऐश्वर्याच्या हाताला जेव्हा दुखापत झाली होती, तेव्हा विवेक ओबेरॉय तिला मदत करत होता. तो तिला रुग्णालयात घेऊन जायचा, तिच्यासाठी व्हीलचेअर ढकलत होता. तेव्हा ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याने सर्वांना असं भासवण्याचा प्रयत्न केला की, ऐश्वर्या त्याच्या प्रेमात वेडी आहे, पण असं काहीही नव्हतं. या परिस्थितीचा फायदा घेत विवेकने पत्रकार परिषद घेतली आणि सलमान खानविरुद्ध मुलाखती दिल्या.”
“सलमानविरोधात मुलाखती देणं विवेकला भारी पडलं. कोणत्याही मुलीबद्दल चुकीच्या गोष्टी बोलणं, ती प्रेमात आहे असं भासवणं हे सगळं चुकीचं आहे. प्रत्यक्षात असं काहीच नव्हतं. ते सगळं फेक होतं, त्याने सगळ्या गोष्टी केवळ क्रिएट केल्या होत्या.” असं झवेरी यांनी सांगितलं.
सलमान-ऐश्वर्याचं नातं का तुटलं?
सलमान आणि ऐश्वर्या रायच्या नात्याबद्दल लेखक म्हणाले, “ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रचंड प्रेमात होते. मात्र, अभिनेत्रीचे आई-वडील भाईजानच्या एक्स रिलेशनशिप्समुळे काहीसे नाराज होते. त्याकाळी सलमानचं नाव सोमी अली आणि संगीत बिजलानी यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं. त्यामुळे सलमान खान हा ऐश्वर्याच्या प्रेमात नसून दोघांचं हे रिलेशनशिप नाममात्र आहे असं ऐश्वर्याच्या पालकांना वाटत होतं. यामुळे या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता.”
“ऐश्वर्याच्या पालकांना सलमान त्यांच्या लेकीबरोबर फक्त फ्लर्ट करतोय असं वाटत होतं. पण, सलमानला ऐश्वर्याशी लग्न करून आपलं आयुष्य सेट करायचं होतं पण, अभिनेत्रीने त्यावेळी स्वत:च्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्यास प्राधान्य दिलं.” असं झवेरी यांनी सांगितलं.