‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. कधी माहेरी गेलेली लीला आत्मविश्वासाने सासरी येऊन सुनांना कामाला लावते; तर कधी सुना तिला घराबाहेर काढण्यात यशस्वी होतात. लीला व एजेमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून कुरबुर चालू असते. दुर्गा एजेला व जहागीरदार घराच्या प्रतिष्ठेला सर्वांत जास्त महत्व देते; परंतु तिचा नवरा किशोर एजेविरुद्ध कारस्थान करताना दिसतो. व्यवसायामध्ये त्याच्या सल्ल्यानुसार त्याचे लहान भाऊ निर्णय घेताना दिसतात. कायम वेंधळी वाटणारी लीला प्रसंगी धाडसाने वागत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा लीला धाडसाने वागणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.
लीलाने फ्रॉड उघड करताच एजेने दोन्ही मुलांना खडसावलं
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, लीला एक स्कूटीवरून एका टेम्पोचा पाठलाग करीत आहे. टेम्पो चालवणाऱ्या चालकाला ती दिसते. तो शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणतो, “ती बाई आपला पाठलाग करीत आहे का?” तो त्याला सांगतो, “त्या आपल्या लीलामॅडम आहेत. एजेसाहेबांच्या मिसेस.” तितक्यात लीला समोरून येते आणि टेम्पोला थांबण्यास भाग पाडते. ती त्यांना म्हणते, “टेम्पो उघडा.” मग त्यातील एक व्यक्ती टेम्पो उघडते. लीला त्यामध्ये असणारे बॉक्स उघडून बघते आणि म्हणते, “ही सगळी पार्सल्स एजेंच्या हॉटेलमधील आहेत.” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते, “लीला ऑफिसमध्ये येऊन चौकशी करीत आहे आणि ती तेथील कर्मचाऱ्याला विचारते, “खरं खरं सांगा हे कोणी केलंय?” त्यावेळी ती व्यक्ती विराज व त्याच्या मोठ्या भावाकडे बोट दाखवते. ही गोष्ट एजेला समजते. तो त्यांच्या कृतीमुळे नाराज असल्याचे दिसते. तो म्हणतो, “आपल्या स्वत:च्याच कंपनीमध्ये एवढा मोठा फ्रॉड करताना तुम्हाला लाज नाही वाटली? यावर आता मला अॅक्शन घ्यावीच लागणार आहे.” एजेच्या बोलण्यानंतर त्या दोघांना भीती वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीलाने उघड केलेल्या फ्रॉडवर काय अॅक्शन घेणार एजे..?”, अशी कॅप्शन दिली आहे.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लीलाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “सुपर लीला.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “उत्तम काम केलं लीला.” आणखी एका नेटकऱ्याने मालिकेचे कौतुक करीत लिहिले, “बेस्ट सीरियल.”
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, दुर्गाला लीला घरात नको होती. तिने सर्वांसमोर अट ठेवली होती की, एक तर लीला या घरात राहील किंवा ती राहील. शेवटी लीला सासरच्या घरातून बाहेर पडते आणि माहेरी येऊन राहते. मात्र, लीलाची काहीही चूक नसताना तिला घराबाहेर जावे लागले, याचे एजे व त्याच्या आईला वाईट वाटते. एजे लीलाची काळजी घेण्यासाठी विश्वरूपला तिच्या घरी पाठवतो. लीलाला दिवसभर घरी राहावे लागू नये म्हणून एजे तिला नोकरी देतो. आता लीला त्याच्याबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये काम करताना दिसत आहे.
दरम्यान, आता लीलाने या सगळ्याचा शोध कसा लावला, एजे आता पुढे काय करणार, मालिकेत नेमके काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.