‘अजूनही बरसात आहे’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘विठू माऊली’ आणि ‘अंतरपाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संकेत कोर्लेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. संकेत नेहमी वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. संकेतची बहीण उमा कोर्लेकरदेखील आता अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ मालिकेत पाहायला मिळाली होती. तेव्हा संकेतने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचं कौतुक केलं होतं. नुकतीच अभिनेत्याने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे; ज्यावर मुक्ता बर्वेसह काही कलाकारांनी प्रतिक्रिया देत त्याचं कौतुक केलं आहे.
अभिनेता संकेत कोर्लेकर आणि त्याची बहीण उमाचं युट्यूब चॅनेल आहे. दोघांना नुकतंच युट्यूबकडून सिल्व्हर प्ले बटण मिळालं आहे. यानिमित्ताने संकेतने पोस्ट केली आहे.
संकेतने उमाबरोबर फोटो शेअर करत लिहिलं आहे, “घरात लहानपणापासून आई पप्पांनी आम्हा दोघांना मोठं करण्यासाठी केलेला संघर्ष बघत मोठे झालोय. पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि आईची कमी पगारात केलेली काटकसर स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे. आई वडिलांनी आमच्यासाठी स्वतःचं पोट किती मारलंय हे आमचं आम्हाला दोघांनाच माहीत आहे. आम्हा दोघांना आई वडिलांनी आमच्यावर केलेल्या संस्काराची जाणीव आहे, त्याची किंमत आहे, त्यामुळे आजपर्यंत आई पप्पांची मान फक्त गर्वानेवर झाली कधीच झुकली नाही. आज त्यांचा मुला मुलीने एकाच घरात दोन सिल्व्हर प्ले बटण आणले आहेत.”
पुढे संकेतने लिहिलं, “आमची स्पर्धा स्वतःशी आहे त्यामुळे हरायची भीती नाही. कोण किती पुढे जातंय कोण किती मागे राहतंय ह्याचाशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. आमचे टार्गेट ठरले आहे. आम्हाला इतकं मोठं व्हायचंय की, आई पप्पांनी आमचा इतका पैसा बघून टेन्शन घेणेच सोडलं पाहिजे. आम्ही क्लिअर आहोत. स्वतःचा रस्ता , स्वतःचे विश्व आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद..बस…बाकी सगळं आमची मेहनत बघून घेईल…धन्यवाद.”
संकेत कोर्लेकरच्या या पोस्टवर बऱ्याच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री रश्मी अनपट, मुक्ता बर्वे, अशोक ढगे यांनी प्रतिक्रिया देत संकेत आणि त्याच्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच चाहते संकेतने लिहिलेल्या पोस्टचं कौतुक करत आहेत.