‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. आता या मालिकेत अक्षरा-अधिपतीमध्ये प्रेमाचं नातं फुलताना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षरा-अधिपतीचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला अन् दोघांच्या नव्या संसाराला सुरुवात झाली. आता अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीत काय घडणार? याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
हेही वाचा – आलिया भट्ट-रणबीर कपूर लेकीचा चेहरा का दाखवत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं केव्हा दाखवणार राहाची पहिली झलक
‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरची पहिली रात्र दाखवण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये, अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी खास गुलाबाच्या फुलांनी खोली सजवलेली दिसत आहे. यावेळी अधिपती अक्षराला पाहून म्हणतो, “मास्तरीण बाई, लय सुंदर दिसतायत हो तुम्ही. एकदम परीवानी दिसाया लागला आहात. आपण आता इथे” तेवढ्यात अक्षरा म्हणते की, तुम्ही मला समजून घ्याना अधिपती. मला हे नातं निभावायचं आहे. तुमच्याकडे नवरा म्हणून बघावं, तुमच्याबद्दल काही वाटावं म्हणून मी खूप प्रयत्न करतेय. पण आतून इच्छाच होत नाहीये. मी तुमची बायको कधी होवू शकत नाही. यानंतर अधिपती म्हणतो, “शिक्षण नाहीये आमचं. पण प्रेम तर आहे की मास्तरीण बाई. संसारात ना महत्त्वाचं आणि अवघड काम असतेय ते बायकोचं मन जिंकणं. आमच्यावर फक्त विश्वास ठेवा मास्तरीण बाई, मी कुठलीच जबरदस्ती तुमच्यावर करणार नाही.”
हेही वाचा – शाब्बास सूनबाई! शिवानी रांगोळेला पुरस्कार मिळताच सासूबाई मृणाल कुलकर्णींच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
दरम्यान, काल ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष – फुलपगारे सर, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – भुवनेश्वरी, सर्वोत्कृष्ट आजी – अधिपतीची आजी, सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी, सर्वोत्कृष्ट जावई – अधिपती, विशेष लक्षवेधी चेहरा – अक्षरा, सर्वोत्कृष्ट जोडी – अक्षरा-अधिपती, सर्वोत्कृष्ट नायिका – अक्षरा, सर्वोत्कृष्ट नायक – अधिपती शिवाय सर्वोत्कृष्ट मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ठरली.