‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर नेहमी चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे अक्षय चर्चेचा विषय असतो. असा हा चर्चेत असलेला अक्षय अभिनेत्यासह उत्तम निवेदक आणि चित्रकार देखील आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी अक्षयने चांगली पेलली होती. तसेच त्याच्यामधल्या चित्रकाराचे दर्शन अनेक व्हिडीओमधून झालं आहे. या बहुगुणी अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेता अक्षय केळकर हा नेहमी ‘बिग बॉस मराठी’च्या संबंधित पोस्ट लिहित असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच तो पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’ आठवणीत रमला होता. कारण ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरून त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने अक्षयने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा – काय म्हणता! विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे , ‘या’ महिन्यात उरकणार साखरपुडा?
अक्षयने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला एक व्हिडीओ शेअर करत लिहिल आहे, “माझ्या आयुष्यातील एका मोठ्या दिवसाला आज एक वर्ष झालं… आयुष्यातला एक क…मा…ल.. क्षण म्हणजे, बिग बॉसने माझ्या घरातल्या प्रवासाचं, खिलाडू वृत्तीचं केलेलं कौतुक आणि एका सुंदर क्षणांनी भरलेल्या प्रवासातला विजयाचा तो शेवटचा दिवस… त्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय. (हे खूप फिल्मी वाटू शकतं, पण एक वर्ष झालंय खरंच वाटत नाही. अजूनही घरात असल्यासारखंच वाटतंय.) मायबाप रसिकांचे मनापासून आभार. हा प्रवास तुमच्यामुळे शक्य झाला. क्रूपासूनने ते सगळ्यांचा मी आभारी आहे. तुम्ही सर्वजण भारी आहात. बिग बॉस आणि मायबाप प्रेक्षक, आय लव्ह यू, मी खरंच फक्त आणि फक्त तुमचाच आहे.”
हेही वाचा – Video: लेकीच्या लग्नात आमिर खानचा ‘ठरकी छोकरो’वर जबरदस्त डान्स, किरण रावसह थिरकला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अक्षयच्या केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आपल्या दमदार खेळीनं, चातुर्यानं ‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व जिंकलं होतं. पण त्याआधी तो काही हिंदी मालिकांमध्ये झळकला होता. शिवाय अक्षय ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्ये समृद्धी केळकरबरोबर पाहायला मिळाला होता. लवकरच तो दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात झळकणार आहे.