‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. सुरुवातीपासूनच या पर्वाची चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी ४’ची ट्रॉफी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याच्यावर आता सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रॉफीचा आणि त्याचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहीलं, “नमस्कार मित्रांनो. सगळ्यात आधी तुम्ही मला जे “क.मा.ल” प्रेम देत आहात त्यासाठी खूप जास्त थॅंक यू. तुमच्या सगळ्या मेसेजेस ना रिप्लाय देऊ शकलो नाही. आणि सगळ्या स्टोरीजही रिपोस्ट करू शकलो नाही. फोन कॉल अजूनही थांबत नाहीयेत आणि तुमचं हे इतकं जास्त प्रेम मला मिळालं त्यासाठी आता काय आणि कोणत्या शब्दात माझे ऋण व्यक्त करू खरंच समजत नाहीये. पण माझ्या संपूर्ण १०० दिवसांच्या प्रवासात जस मला समजून घेतलंत, तसं आताही समजून घ्याल याची मला खात्री आहे.”
आणखी वाचा : “तिच्या मनात माझ्याबद्दल…,” ‘बिग बॉस ४’चं विजेतेपद मिळवताच अक्षय केळकरने अपूर्वा नेमळेकरबाबत केलं भाष्य
पुढे तो म्हणाला, “आजवर जे काम केलं त्यातून देशातील काही भागांपर्यंत आणि काही घरापर्यंत पोचत होतो, पण आपल्या घरातली कौतुकाची थाप ही बाहेरच्या माणसाच्या कौतुकापेक्षा जास्त हवीहवीशी वाटते. आणि म्हणूनच खरतर माझ्या घरातल्या, “महाराष्ट्रातल्या” आणि “मराठी” माणसांपर्यंत पोचण्यासाठी हा लढा लढलो आणि तुमची शाबासकी ‘ती (ट्रॉफी) च्या स्वरूपात पोचली! कोणताच माणूस परिपूर्ण नसतो! मीही नाही ! काहीना मी नाही आवडलो. त्यांच्याही प्रतिक्रिया ते माझ्यापर्यंत पोचवत आहेत.”
हेही वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल
“असं म्हणतात की, आपण त्यांच्यावरच असे रागावतो ज्याला आपण आपला मानतो! आरोप प्रत्यारोपांच्या जाळ्यातून देवही वाचू शकले नाहीत, मी तर साधा माणूस आहे! माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मोठ्या मनाने मला माफ करा. तो एक खेळ होता. एक खेळ म्हणूनच मी खेळला आणि त्या व्यतिरिक्त आणि त्या अधिक कधीच काही नव्हते. आई म्हणते गोड पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी त्यात चिमुटभर मीठ टाकतात. असेल…माझ्या या गोड प्रवासात तुम्ही सुद्धा गरजेचे होतात. तुम्हालाही खूप धन्यवाद आणि ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, तुमच्या साठी I love You मी फक्त तुमचाच आहे,” असंही त्याने लिहीलं. अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट्स करत चाहते त्याच्या या खिलाडूवृत्तीचं कौतुक करत आहेत.