‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. सुरुवातीपासूनच या पर्वाची चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी ४’ची ट्रॉफी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली. आता बिग बॉसचं विजेतेपद मिळवताच त्याने अपूर्वाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धा पहायला मिळाली. या घरात खेळल्या गेलेल्या टास्कदरम्यान त्यांच्यात वाद झाल्याचंही पहायला मिळालं. अपूर्वा आणि अक्षय शेवटपर्यंत एकमेकांना टफ फाईट देत होते. पण शेवटी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यात यश आलं. या घरात त्यांच्यात मतभेदही झाले होते. आता अक्षयने त्यावर भाष्य करत अपूर्वाचं त्याच्याबद्दलचं मत अखेरपर्यंत बदललं की नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “तिच्या मनात माझ्याबद्दल असलेलं मत बदलेलं मला अजिबात दिसलं नाही. घरातून बाहेर पडताना आम्ही एकमेकांना मिठी मारली पण तिचं माझ्याबद्दलचं मत बदललेलं असेल असं मला वाटत नाही. कदाचित आता एपिसोड बघितल्यावतर ते बदलू शकतं. कारण मी तिच्याशी भांडलो तेव्हा माझ्या मनात तिच्याविषयी काहीही अढी नव्हती. मी तिला म्हटलं की आपले एपिसोड बघ, मग कदाचित तुझं मत बदलेल. पण मी टास्कदरम्यान ज्या सदस्यांशी भांडलो त्यांच्याशीच टास्कनंतर हसत खेळत बोललो. आता हे पर्व संपलेलं आहे आणि त्यानंतरही तुम्ही तुमची घरात झालेली भांडणं बाहेर घेऊन एकमेकांशी वागत असाल तर मग त्याचा उपयोग नाही.”
हेही वाचा : “वाद विवाद खूप आहेत पण…” अपूर्वा नेमळेकरने ‘बिग बॉस ४’च्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे यांच्यामध्ये ‘बिग बॉस ४’चा महाअंतिम सोहळा रंगला. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेही एलिमिनेट झाली. त्यानंतर घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे टॉप ३ स्पर्धक उरले. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले आणि त्यामुळे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे टॉप २ स्पर्धक ठरले. त्यातून अक्षय केळकर ‘बिग बॉस ४’चा विजेता ठरला.