बिग बॉस मराठीचं चौथं पर्व काही दिवसांपूर्वीच संपलं. अभिनेता अक्षय केळकर यांनी ‘बिग बॉस ४’च्या ट्रॉफी वर आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस’मुळे अक्षय चांगलाच चर्चेत आला होता. तर त्यानंतर देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत आहे. आजच त्याने एक पोस्ट शेअर केली जी आता चांगलीच चर्चेत आली आहे.
‘बिग बॉस ४’मुळे अक्षय केळकरचा चाहता वर्ग चांगलाच वाढला. सोशल मीडिया वरून तो त्याच्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्याच्याकडे अनेक आगामी प्रोजेक्ट्स आहेत. तर आता अशातच ‘बेबी ऑन बोर्ड’ असं म्हणत त्यांनी एक नवी पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने त्याच्या आगामी वेब फिल्मचा टीझर शेअर केला.
अनेकदा अक्षय समृद्धी केळकरबरोबर दिसतो. त्यांचे अनेक फोटो, रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अशातच अक्षयने त्याचा आणि समृद्धीचा एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ही गुड न्यूज म्हणजे समृद्धी आणि अक्षयच्या ‘दोन कटिंग’ या वेब फिल्मचा तिसरा भाग येत आहे. याचा एक टीझर त्याने सोशल मीडियावर शेअर केला. यात समृद्धी अक्षयला ती प्रेग्नंट असल्याचं सांगताना दिसत आहे. तर समृद्धीचं हे बोलणं ऐकून अक्षयही भावूक झालेला दिसला.
हा टीझर शेअर करत अक्षय ने लिहिलं, “अँड गूड न्युज हिअर…बेबी ऑन बोर्ड… वर्क इन प्रोग्रेस…दोन कटिंग १…२ नंतर तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे ‘दोन कटिंग ३’…लवकरच आपल्या फिलमबाझ फिल्म कंपनीवर.” अक्षयची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तर अक्षय आणि समृद्धीला एकत्र पाहायला चाहते उत्सुक झाले आहेत. या पोस्टवर कमेंट करत सर्वजण त्यांचं अभिनंदन करत आहेत.