छोट्या पडद्यावरील मालिका वर्षानुवर्षे सुरू असतात. अनेकदा मालिकांमध्ये नव्या पात्रांची एन्ट्री होते, तर काही वेळेला जुने कलाकार अर्ध्यावर मालिका सोडण्याचा निर्णय घेतात. गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांमध्ये रिप्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर तिच्याऐवजी ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये स्वरदा ठिगळे वर्णी लागली. तर, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये ३ कलाकारांनी सोडलीये. याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका दिशा परदेशीने सोडल्यावर सुद्धा सर्वत्र चर्चा झाली होती. आता यांच्यापाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्यावर्षी १८ मार्चला ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू झाली. या मालिकेचं कथानक एकत्र कुटुंब, घरगुती वाद यावर आधारलेलं आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र, या मालिकेतील सहकलाकार सुद्धा तेवढेच दमदार आहेत. यापैकी एका लोकप्रिय अभिनेत्याने या मालिकेला रामराम केला आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत विक्रांत हे पात्र अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. विक्रांत हा जानकीच्या नणंदेचा म्हणजेच शर्वरीचा नवरा असतो. आता नुकतीच अक्षयने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोतून याबद्दलची माहिती मिळाली आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये शर्वरी ( भक्ती देसाई ) आणि विक्रांतची भूमिका साकारणारा नवीन अभिनेता, एकत्र पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अक्षय वाघमारेने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे हा डॅडी अरुण गवळींचा जावई आहे. त्याच्या पत्नीचं नाव योगिता गवळी-वाघमारे असं आहे. अक्षयने यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये तो झळकला होता. यामध्ये त्याने नेत्राचा नवरा निनादची भूमिका उत्तमरित्या साकारली होती.
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.