मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर व हार्दिक जोशी २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत राणादा-पाठकबाईंनी पुण्यात लग्नगाठ बांधली. हार्दिक-अक्षयाने सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात झाली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हार्दिक व अक्षयाने लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला होता. पाठकबाईंनी हातामागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नथ व पारंपरिक दागिन्यांमध्ये अक्षयाचं सौंदर्य अधिक खुलून आलं होतं. तर राणादाही धोतर व कुर्तामध्ये राजबिंडा दिसत होता. अक्षया-हार्दिकच्या लग्नातील मराठमोळ्या लूकची सोशळ मीडियावर चर्चा रंगली आहे. अक्षयाने लग्नातील तिच्या या लूकबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा>> “इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत
अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. “मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपारिक दागिने आणि सगळं टिपिकल. कारण मला आवडतं..!” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अक्षयाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया व हार्दिक घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांच्या राणादा-पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम दिलं होतं. ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकल्याने चाहतेही खूश आहेत. अनेकांनी अक्षया-हार्दिकला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.