Akshaya Deodhar : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षयाने छोट्या पडद्यावर सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. यामध्ये तिने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. राणादा मालिकेत तिला ‘पाठकबाई’ अशी हाक मारत असल्याने हळुहळू महाराष्ट्रातील घराघरांत अक्षयाला ‘पाठकबाई’ ही नवीन ओळख मिळाली. या मालिकेने निरोप घेतल्यावर अक्षयाने ‘हे तर काहीच नाय’ या शोमध्ये काम केलं. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये देखील झळकली. आता काही महिन्यांच्या ब्रेकनंतर अक्षया पुन्हा एकदा ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
‘झी मराठी’वर नुकतीच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन कौटुंबिक मालिका सुरू झालेली आहे. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अक्षया या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची मोठी मुलगी भावनाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अक्षयाने या नव्या वर्षात तिचे संकल्प काय आहेत. याबद्दल खुलासा केला आहे.
अक्षयाने सांगितले तिचे संकल्प
अक्षया सांगते, “माझ्यासाठी २०२४ कमाल वर्ष होतं, जरी त्याची सुरुवात तितकीशी बरी झाली नव्हती. पण वर्ष माझ्यासाठी छान होतं. २०२४ मध्ये मी पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर काम करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, मला नेहमीच व्यवसाय करायचा होता, तर २०२४ मध्ये मी बिजनेसवुमन सुद्धा झाले. तशा आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत. परंतु, एक गोष्ट मला वाटते की, मी वजन कमी करायची प्रक्रिया थोडी आधी सुरु केली पाहिजे होती ती उशिरा सुरु केली. २०२४ या वर्षाने खूप काही शिकवलं. आपला कम्फर्ट झोन सोडावाच लागतो मग ते कामाच्या बाबतीत असो किंवा वैयक्तिक या गोष्टी मला समजल्या.”
“या वर्षात काही संकल्प असतील ते म्हणजे, २०२५ मध्ये मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, दुसरी गोष्ट आता कामात ब्रेक नाही आणि ‘लक्ष्मी निवास’मध्ये छान काम करायचं आहे. तिसरी गोष्ट, मला माझं वजन कमी करायचं आहे, ज्यासाठी मी डाएट आणि वर्कआऊट दोन्ही गोष्टी सुरु केल्या आहेत.” असं अक्षया देवधरने सांगितलं.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत अक्षयासह हर्षदा खानविलकर, निखिल राजेशिर्के, सौरभ गोखले, कुणाल शुक्ला, अनुज ठाकरे, तुषार दळवी, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड, तन्वी कोलते, महेश फाळके, दिव्या पुगावकर अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.