Akshaya Deodhar Saree Store Nameplate : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. या मालिकेत राणादा तिला नेहमी पाठकबाई अशी हाक मारायचा. तेव्हापासून अभिनेत्रीला घरोघरी ही नवीन ओळख मिळाली. पुढे जाऊन, राणा व पाठकबाईंची ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने आणखी एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.
अक्षया देवधरने अभिनयासह एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पाठकबाई आता बिझनेसवुमन झाल्या आहेत. तिने मैत्रिणींच्या साथीने साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. अक्षयाने ‘भरजरी’ हे साड्यांचं नवीन दालन पुण्यात सुरू केलं आहे. साड्यांच्या नव्या व्यवसायाची पहिली झलक अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम शेअर केली होती. या दुकानाच्या उद्घाटनाला अक्षयाचा नवरा अभिनेता हार्दिक जोशी सुद्धा उपस्थित होता.
पुणेरी पाटीवरच्या मजकूराने वेधलं लक्ष
आता अक्षया ( Akshaya Deodhar ) एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे अभिनेत्रीने तिच्या साड्यांच्या दुकानात लावलेली पुणेरी पाटी! अक्षयाचं दुकान पुण्यात असल्याने त्याला समर्पक अशी पाटी अभिनेत्रीने तिच्या दुकानात लावून घेतली आहे. यावर लिहिलेला मजकूर सर्वांचं लक्ष वेधून घेतो. अक्षयाने इन्स्टाग्राम स्टोरीवर या पुणेरी पाटीचा फोटो शेअर करत याबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
अक्षयाने दुकानात लावलेल्या पुणेरी पाटीवर “माणसं भेटतात, वस्तू मिळतात आणि साड्या घालत नव्हे तर नेसतात…!” असं लिहून घेतलं आहे. बऱ्याच महिला, “साडी घालतात, मी साडी घालते” असा शब्दप्रयोग करतात पण, व्याकरणाच्या दृष्टीकोनातून तो चुकीचा आहे. त्यामुळे ‘साडी ही नेसली जाते’ हे सांगण्यासाठी अभिनेत्रीने तिच्या नव्या दुकानात ही खास पाटी लावून घेतली आहे.
हेही वाचा : ‘गुलाबी साडी’नंतर संजू राठोडच्या ‘काळी बिंदी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मुख्य भूमिकेतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
दरम्यान, अक्षया देवधरच्या ( Akshaya Deodhar ) वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पती हार्दिक जोशीबरोबर तिने नुकतीच ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यामुळे भविष्यात हे दोघं पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक करणार का याबाबत चर्चा रंगल्या आहेत. प्रेक्षक देखील त्यांना पुन्हा एकदा मालिकेत एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd