Akshaya Deodhar New Business : मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळालं. अभिनयाव्यतिरिक्त अलीकडच्या काळात बरेच कलाकार हॉटेल, कपड्यांच्या व्यवसायात पदार्पण करत आहेत. आता यामध्ये मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. यामधील राणादा अन् पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्यामुळे प्रेक्षक आनंदी होतेच पण, आता अक्षयाने तिच्या सगळ्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षयाने स्वत:चं साड्यांचं दालन सुरू करत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीला तिच्या या व्यवसायामध्ये आणखी दोन मैत्रिणींची साथ लाभली आहे. अक्षयाने आपल्या नव्या व्यवसायाबद्दल आणि तिच्या दोन मैत्रिणींबद्दल पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss : “…तर यांचं शिक्षण चुलीत घाला”, सूरज चव्हाणला मराठी अभिनेत्याचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, “तू सच्चा आहेस”
अक्षया देवधरने सुरू केला नवा व्यवसाय ( Akshaya Deodhar )
“‘भरजरी’ – नाम (निधी, अक्षया आणि माधुरी) आम्हा तिघींचं हे स्वप्न… प्रत्येकीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात पाहिलेलं… एकत्र येऊन पूर्ण करत आहोत. तुमच्या साथीने… विश्वासाने आणि प्रेमाने… हे पाऊल पुढे टाकत आहोत…आपल्या ‘भरजरी’चे नवीन दालन लवकरच सुरू होत आहे. प्रेम कायम असू दे…आमच्यावरही आणि आपल्या ‘भरजरी’ वरही.” अशी पोस्ट शेअर करत अक्षयाने आपल्या नव्या व्यवसायाची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेत्रीच्या ‘भरजरी’ दालनात प्रीमियम साड्यांचं कलेक्शन असेल. सिल्क, पैठणी, कांजीवरम, बनारसी, चंदेरी अशा विविध प्रकारच्या साड्यांची झलक यामध्ये पाहायला मिळेल. दोन दिवसांआधी अक्षयाने लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देईन असं सांगितलं होतं. तेव्हाच अनेकांनी अभिनेत्री कपड्यांचा व्यवसाय सुरू करेल असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, सध्या अक्षयावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नेटकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळींनी अभिनेत्रीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘तुझ्यात जीव रंगला’ या ‘झी मराठी वाहिनी’वरील मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील घराघरांत तिला मालिकेतील ‘पाठकबाई’ या नावाने सुद्धा ओळखतात. सध्या अक्षयावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.