कलर्स वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मालिकेतील लतिका व अभिमन्यूची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री अक्षया नाईक या मालिकेत लतिकाची भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांशी शूटिंग दरम्यानच्या काही गमतीजमती शेअर करत असते. पण आता नुकताच तिने तिच्या डेट नाईटचा फोटो शेअर केला आहे.
अक्षयाचं मालिकेतील सर्व सहकलाकारांशी खूप चांगलं बॉण्डिंग आहे. शूटिंगदरम्यानचे काही धमाल व्हिडीओ आणि फोटो शेअर करून ती त्यांच्यातलं बॉण्डिंग चाहत्यांना दाखवतही असते. आता अशातच या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एका कलाकाराने मालिकेतून एग्झिट घेतली. पण आपल्या सहकलाकाराची खूप आठवण येत असल्यामुळे तिने त्या कलाकाराशी व्हर्च्युअल डेट सेलिब्रेट केली आहे. ही कलाकार दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती द्रविड आहे.
अदितीने या मालिकेत नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारली. ती अभ्याची मैत्रीण असते आणि लतिकाला नेहमीच साथ देताना दिसते. मात्र नुकतीच तिची या मालिकेतून एग्झिट झाली. याबाबत अदितीने एक खास पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात तिने शूटिंगचा अनुभव सांगत मालिकेच्या टीमचे आभार मानले होते. अदिती आणि अक्षया यांच्यात मालिकेच्या निमित्ताने खूप चांगली मैत्री झाली. पण आता दोघीही एकमेकांना खूपच मिस करू लागल्या आहेत.
या मालिकेचं शूटिंग नाशिकला होतं. त्यामुळे सगळेच कलाकार आपल्या घरापासून दूर नाशिकला राहतात. पण आता मालिकेतून बाहेर पडल्यामुळे अदितीला नाशिक सोडावं लागलं आहे. त्यामुळे आता त्या दोघी फोन आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा : अभ्याच्या वाढदिवशी लतिकाकडून हटके शुभेच्छा; फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझी नावडती व्यक्ती…”
नुकताच अक्षयाने त्यांच्या व्हिडीओ कॉलचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोमध्ये अक्षया शूटिंग सेटवर असल्याचं दिसत आहे, तर अदिती तिच्या घरी आहे. हा त्यांचा फोटो शेअर करत अक्षयाने लिहिलं, “आवश्यक असलेली व्हर्च्युअल डेट नाईट…” अक्षयाची ही पोस्ट पाहून त्या दोघीही एकमेकींना किती मिस करत आहेत हे चाहत्यांना पुन्हा एकदा दिसून आलं आहे.