‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ मालिका. या मालिकेने साडे तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या वर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अशातच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आदित्यच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुलेने ( Ambar Ganpule ) होणारी बायको अभिनेत्री शिवानी सोनारसाठी ( Shivani Sonar ) एक खास पोस्ट लिहिली आहे.
९ एप्रिलला अभिनेता अंबर गणपुले ( Ambar Ganpule ) व शिवानी सोनार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघांच्या सारखपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आज शिवानी सोनारचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अंबरने होणारी बायको शिवानीसाठी खास पोस्ट लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अंबरने शिवानीसाठी लिहिलेली खास पोस्ट वाचा…
अंबर गणपुलेने ( Ambar Ganpule ) शिवानीबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आयुष्य रंगीबेरंगी आहे हे दाखवल्याबद्दल तुझा मी आभारी आहे. तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस जेव्हा माझी उतरती कळा सुरू होती तेव्हा तू मला उभारी दिलीस. त्यासाठी मी तुझा सर्वस्वी ऋणी आहे. जेव्हा तू माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी असतेस तेव्हा माझं आयुष्य खूप चांगलं असतं. आज तुझ्या वाढदिवसानिमित्ताने मी तुला जगातील सर्व आनंद आणि यशासाठी शुभेच्छा देतो. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवो. कारण तू त्यास पात्र आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
अंबरच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शिवानी सोनारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनघा अतुल, रेश्मा शिंदे, सुकन्या मोने, अन्विता फलटणकर, आरती मोरे यांनी शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच शिवानीने देखील प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, अंबर गणपुले ( Ambar Ganpule ) व शिवानी सोनारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने ‘रंग माझा वेगळा’ सोडल्यानंतर ‘लोकमान्य’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत अंबर गोपाळ गणेश आगरकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. तसंच शिवानीची सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ मालिका सुरू आहे. या मालिकेत शिवानी अभिनेता सुबोध भावेसह काम करत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd