‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंबर गणपुळे ( Ambar Ganpule ) नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘दुर्गा’मध्ये तो प्रमुख भूमिकेत झळकला आहे. २६ ऑगस्टपासून ‘दुर्गा’ ही नवी मलिका सुरू झाली आहे. या मालिकेत अंबरसह अभिनेत्री रुमानी खरे प्रमुख भूमिकेत दिसत आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. ही नवी मालिका आणि त्यामध्ये प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर अंबरची होणारी पत्नी अभिनेत्री शिवानी सोनारची ( Shivani Sonar ) प्रतिक्रिया काय होती? जाणून घ्या…
अभिनेता अंबर गणपुळेचा ( Amber Ganpule ) ९ एप्रिलला शिवानी सोनारबरोबर मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. दोघांच्या सारखपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. साखरपुड्यानंतर दोघं देखील आता नवीन मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवानीची ‘सोनी मराठी’वर ‘तू भेटशी नव्याने’ मालिका सुरू झाली. त्यानंतर २६ ऑगस्टपासून अंबरची ‘दुर्गा’ नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यामुळेच अंबर काही मुलाखतीमध्ये शिवानीला ‘लेडी लक’ म्हणताना दिसत आहे.
शिवानी सोनारची प्रतिक्रिया
‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना अंबरने ( Amber Ganpule ) ‘दुर्गा’ मालिका मिळाल्यानंतर शिवानीची काय प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं. अंबर म्हणाला, “ती खूपच खुश होती. आता तू माझ्या घरात आला आहेस, असं ती म्हणाली. चांगल्या गोष्टीचा भाग होता आलाय, त्यामुळे ती खूप आनंदी होती. जीव लावून काम कर. अजिबात मागे राहू नकोस. पुढे-पुढे कर म्हटली.”
पुढे अंबरला ( Amber Ganpule ) विचारलं की, शिवानी खऱ्या आयुष्यात ‘दुर्गा’ आहे का? त्यावर अभिनेता म्हणाला, “हो, ती तिची मत खूप स्पष्टपणे मांडते. तिच्यातली दुर्गा कधी कधी माझ्यासमोर बाहेर येते. पण मी प्रयत्न करतो ती जास्त वेळ येऊ नये. तिला शांत कसं करायचं हे मला माहित आहे.”
दरम्यान, ‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्गा’ नव्या मालिकेत अंबर गणपुळे ( Amber Ganpule ), रुमानी खरेसह शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. संध्याकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा’ मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेमुळे ‘कलर्स’ची ‘अंतरपाट’ ही मालिका ऑफ एअर झाली आहे.