अभिनेता अमेय वाघ कायमच त्याच्या मिश्कील स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतो. उत्तम अभिनय, विनोद बुद्धी, मिश्कील स्वभाव यांमुळे तो सर्वांना आपलंसं करून घेतो. तर अमेय अभिनयाच्या बाबतीतही फार निवडक भूमिका साकारताना दिसतो. त्यानं आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक भूमिकेचं काहीतरी वैशिष्ट्य असल्याचं पाहायला मिळतं.

अशातच आता अमेय एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी तो कुठल्या मालिका किंवा चित्रपटातून नव्हे, तर एका भन्नाट कार्यक्रमामधून पाहायला मिळत आहे. ‘शिट्टी वाजली रे’ या ‘स्टार प्रवाह’वरील नव्या कार्यक्रमात तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमानिमित्त अमेयनं ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाइव्ह जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यानं प्रेक्षकांना काही प्रश्न विचारले, तर त्यांनीही कार्यक्रमासंबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील, तर विचारा, असं म्हटलं होतं.

त्यामध्ये अनेकांनी त्याला प्रश्न विचारले; परंतु एका नेटकऱ्याने अमेयला “ओव्हर अॅक्टिंग कमी कर जरा”, अशी कमेंट केली होती. त्यावर अमेयनंदेखील त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं. अमेयनं नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं की,”हो करणार नं मी ओव्हर अॅक्टिंग करीतच नाही, कायम अंडरअॅक्टिंगच करतो”,असं म्हटलं आहे.

तसेच, लाईव्हदरम्यान अमेयने ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. या कार्यक्रमात तो सूत्रसंचालक म्हणून काम करणार असून, तब्बल आठ वर्षांनी तो सूत्रसंचालन करीत असल्याचं म्हटलं आहे. तर अमेयसह ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री मधुराणी गोखले, रूपाली भोसले, निक्की तांबोळी, हेमंत ढोमे, आशीष पाटील यांसारखे नावाजलेले कलाकार पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहेत. तर, गौतमी पाटील, धनंजय पोवार, विनायक माळी ही मंडळीदेखील पाहायला मिळत आहे. कार्यक्रमात ही सगळी कलाकार मंडळी वेगवेगळे पदार्थ बनविताना पाहायला दिसत आहेत. एकंदरीतच आता हे सर्व जण मिळून धुमाकूळ घालताना दिसणार आहेत.

दरम्यान, अमेय वाघने यापूर्वीही सूत्रसंचालन केलं असून ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याआधी तो ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’, ‘मिसेस अन्नपूर्णा’, ‘२ मॅड’ यांसारख्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना दिसला होता. तर शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असून, शनिवार-रविवारी हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.