छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतात. अभिनेता समीर चौघुलेही याच शोमधून घराघरात पोहोचला. विनोदाचं करेक्ट टायमिंग आणि कुशल अभिनयाच्या जोरावर समीर चौघुलेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. ‘हवाहवाई’ चित्रपटाच्या निमित्ताने त्याने लोकसत्ता डिजीटल अड्डाला हजेरी लावली.
समीर चौघुलेने यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा किस्साही सांगितला. काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन समीर चौघुलेच्या पाया पडत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. याबाबत समीर चौघुलेला “’केबीसी’च्या सेटवर हास्यजत्रेच्या टीमने अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते तुमच्या पाया पडले होते? नेमकं काय घडलं होतं?”, असा प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा >> रेखा यांच्यावर चाहत्याने अश्लील कमेंट केल्यामुळे अमिताभ बच्चन यांचा राग अनावर झाला अन्…
‘केबीसी’च्या सेटवरील अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा प्रसंग समीर चौघुलेच्या डोळ्यापुढे उभा राहिला. यावर उत्तर देत “अमिताभ बच्चन हे मनोरंजन क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. आम्ही खरं तर कलाविश्वातील कुणाच्याही ओळखीने अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहचू शकलो असतो. पण त्यांनी स्वत: एकदा चॅनेलच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरकडे हास्यजत्रेचं कौतुक केलं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्याकडे त्यांनी हास्यजत्रेतील कलाकार तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहेत. यावर अमिताभ बच्चन यांनी मलाही त्यांना भेटायला आवडेल, असं म्हणत वेळ दिली”, असं चौघुलेने सांगितले.
हेही पाहा >> Photos : …अन् चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रेखा यांना रडू कोसळलं, नेमकं काय घडलं होतं?
“ते नियमित हास्यजत्रा बघतात. त्यांच्या टीव्हीवर सोनी मराठी हे चॅनेल बाय डिफॉल्ट लागत असल्याने त्यांना हास्यजत्रा बघायची सवय लागली. त्यांनी आम्हाला भेटण्यासाठी २० मिनिटे वेळ दिली होती. खरं तर एखाद्या लग्नसोहळ्यासाठी आपण तयारी करतो, तशी तयारी आम्ही आमिताभ बच्चन यांना भेटायला जाताना केली होती. आमची नावं त्यांच्या लक्षात नसली तरी ते आमच्यातील प्रत्येकाला चेहऱ्याने ओळखत होते”, असंही चौघुलेने सांगितले.
हेही वाचा >> Video : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
समीर चौघुले पुढे म्हणाला, “अमिताभ बच्चन यांना मी म्हणालो सर मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यावर ते अरे मलाच तुमचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे असं म्हणून माझ्या पायाला हात लावण्यासाठी ते खाली वाकले. माझ्यामते, एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली ती मानवंदना होती. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. मी अमिताभ बच्चन यांना खूप फॉलो केलेलं आहे. त्यांची लांब गाडी बघूनच मी माझी सियाज कार घेतली होती. अमिताभ बच्चन आणि माझा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तो फोटो मॉर्फिंग केल्याचंदेखील म्हटलं होतं. पण अशा लोकांकडे मी फार लक्ष देत नाही”.