बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. बिग बी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असो वा कपड्यांच्या, ते नेहमीच स्वतःला अपडेट ठेवत असतात. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्याबरोबर काम करणारी त्यांची ड्रेस डिझायनर आणि स्टायलिस्टही अमिताभ यांना ट्रेंड प्रमाणे दिसण्यासाठी म्हणून खूप मेहनत घेते. अमिताभ यांच्या स्टायलिस्टने ते प्रत्यक्षात किती फॅशनप्रेमी आहेत याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता.
आणखी वाचा : चाहत्याला फोटो देत असताना सारा अली खानच्या डोळ्यात आले अश्रू, व्हिडीओ व्हायरल
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे अमिताभ सर्वांच्या घराघरात पोहोचले. या कार्यक्रमाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. अमिताभ बच्चन यांचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितके प्रेक्षकांना आकर्षित करते, तितकेच त्यांचे कपडेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या स्टायलिंगचं श्रेय जातं डिझायनर प्रिया पाटीलला.
एका मुलाखतीत तिने सांगितलं, “त्यांच्या कोटची बटणं पटकन लावता येतील अशी असावीत, जॅकेटचं झीपर लॉक टाइट नसावं, फॅब्रिकचं मटेरियल सॉफ्ट असावं, सूटची बटण धारदार नसावीत हा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्यांच्या बोटांना बटणं लागणार नाहीत या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी मी आवर्जुन पाहते. मी एवढं सगळं त्यांच्यासाठी करते कारण ते त्या पात्रतेचे आहेत. कधीकधी चुका होतात तेव्हा ओरडा मिळतो ,पण आमचं नातं शिक्षक-विद्यार्थ्याचं आहे.”
पुढे ती म्हणाली, “अमिताभ यांना काळा, नेवी ब्ल्यू यांसारखे गडद रंग खूप आवडतात. त्यांना चॉकलेटी आणि राखाडी रंग आवडत नाहीत. कारण त्यांना वाटतं की हे रंग त्यांच्या त्वाचेच्या रंगासारखे दिसतात आणि त्यामुळे या रंगाचे कपडे त्यांच्यावर चांगले दिसत नाहीत.”
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. आजही काम करतानाची त्यांची ऊर्जा अनेकांना प्रेरणा देते.