अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे चांगलेच चर्चेत असतात. या खेळात ते स्पर्धकांशी तसेच प्रेक्षकांशी अत्यंत मोनमोकळेपणाने आणि हसत खेळत गप्पा मारतात. चित्रपटसृष्टीचा महानायक असले तरी या कार्यक्रमात बिग बी फार वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतात. नुकतंच त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या डायट प्लानविषयी आणि त्यांच्या खाण्याच्या सवयीविषयी खुलासा केला गेला. या कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला गेला ज्यात जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा अमिताभ यांच्या खाण्याच्या दिनचर्येबद्दल गप्पा मारताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये जया बच्चन म्हणाल्या, “अमिताभ यांना कधीही काय खाणार हा प्रश्न विचारला की ते नेहमी उत्तर देतात की ‘तुला जे हवंय ते.” आणि जेव्हा मी त्यांच्यासमोर पोळी, सूप आणि वडापाव असे पर्याय ठेवायचे तेव्हा या तिन्ही गोष्टींपैकी त्यांना काहीच नको असतं. पोळी त्यांना नको असते, सूप हे त्यांना बोरिंग वाटतं आणि वडा पाव पोटाला त्रासदायक ठरतो. मी पुन्हा त्यांना विचारते तेव्हासुद्धा त्यांचं उत्तर तेच असतं. ‘तुला जे हवंय ते.’ याचा अर्थ मला आजवर समजलेला नाही.”
हा व्हिडिओ पाहून अमिताभ यांनी समस्त पुरुष वर्गाला एक सल्ला दिला. अमिताभ म्हणाले, “बायकोशी जास्त वाद घालायला जायचं नाही. तुम्हाला तुमच्या आवडत्या भाज्या नाही मिळाल्या तरी तुम्ही त्यांचं निमूटपणे ऐकलं पाहिजे. तुमच्या मुलांसाठी ती एक आई म्हणून जे करतीये त्याखातर तर हे नक्कीच करायला हवं.”
अमिताभ बच्चन यांचा यावर्षी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट चांगलाच हीट ठरला. त्यापाठोपाठ आलेला ‘गुडबाय’ या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. नुकताच बच्चन यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे शिवाय त्याला बॉक्स ऑफिसवरही उत्तम यश मिळत आहे. याबरोबरच बिग बी हे ‘केबीसी १४’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असतात.