सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सोळावे पर्व सुरु आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह त्यांना बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करत आहे. अमिताभ बच्चन या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाचे काम करतात. पहिल्या पर्वापासून ते ‘केबीसी’शी जोडले गेले आहेत. या कार्यक्रमामधील एक व्हिडीओ सध्या फार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ त्यांच्या सवयींबद्दल बोलताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी हसत खेळत हा खेळ पुढे नेत असतात. कार्यक्रमाच्या एका भागामध्ये पिंकी जवरानी नावाच्या स्पर्धक त्यांच्यासमोर हॉटसीटवर बसल्या होत्या. केबीसीचा प्रश्नोत्तरांचा खेळ सुरु असताना अमिताभ त्यांच्यासह गप्पा मारत होते. तेव्हा पिंकी यांनी त्यांच्यासमोर मनातला विचार बोलून दाखवला. “तुम्हाला मी कधीही कपडे रिपीट करताना पाहिलं नाहीये. तुम्ही एकदा परिधान केलेले कपडे परत कधीच वापरत नाही का?” असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर देत अमिताभ म्हणाले, “आम्ही एकदा परिधान केलेल्या कपड्यांमध्ये दिसत नसलो, तरी आम्ही कपडे रिपीट करत असतो”
आणखी वाचा – आर्यन खान करणार मनोरंजनसृष्टीत पदार्पण; पण अभिनेता म्हणून नाही तर…
पुढे पिंकी यांनी “मग तुमच्या घरी कपडे धुतले जातात का?” असे विचारले. अमिताभ यांनी हसत या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, “हो तर. मी ते स्वत: धुतो. तुम्हाला काय वाटतं आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत का? आम्ही एखादा कार्यक्रम, सोहळा असला, तरच नवीन कपडे घालतो. आता मी कार्यक्रम संपवून जेव्हा घरी जाईन, तेव्हा माझा घरचा कुर्ता-पायजमा घालेन” अमिताभ बोलत असताना पिंकी मध्येच “ते कपडे धुतलेले असतील ना..” असे म्हणाल्या. यावर अमिताभ यांनी “होय. मी माझे कपडे स्वत: धुतो. कपडे सुकल्यावर ते इस्री करुन नीट घडी घालून कपाटामध्ये ठेवतो” असा जवाब दिला.
या गप्पा झाल्यानंतर अमिताभ पुन्हा खेळाकडे वळले. कार्यक्रमादरम्यान ते हसत-हसत “कपडे धुण्याबद्दल इतक्या वेळा बोलल्यामुळे मी चौथा प्रश्नाऐवजी ‘चौथा कपडा’ असं बोलणार होतो” असे म्हणाले. त्यांच्या ८० वाढदिवसानिमित्त ११ ऑक्टोबर रोजी खास पाहुणे केबीसीच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत.