बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. त्यांनी या कार्यक्रमाच्या बऱ्याच पर्वांमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे. लोकांसाठी ‘केबीसी’ म्हणजे अमिताभ बच्चन असे समीकरण तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या सेटवर त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला गेला. या विशेष भागाचे आयोजन अभिषेक आणि केबीसीच्या टीमद्वारे करण्यात आले होते. हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेमध्ये वरच्या स्थानावर आहे.
या कार्यक्रमाचा नवा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये अमिताभ यांच्या समोर हॉटसीटवर दीपक जैन नावाचे गृहस्थ बसलेले असल्याचे पाहायला मिळते. प्रोमो व्हिडीओच्या सुरुवातीलाच अमिताभ हसत त्यांना ‘मान्यवर, तुम्ही भोपाळचे आहात आणि मी तिथला जावई आहे’, असे म्हणतात. पुढे त्यांनी जया बच्चन मुळच्या भोपाळच्या असल्याचा खुलासा कार्यक्रमादरम्यान केला.
केबीसीचा खेळ खेळताना दीपक यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर १२ लाख ५० हजार रुपयांची कमाई केली. त्यानंतर त्यांना २५ लाख रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला. खेळामध्ये त्यांनी आधीच सर्व लाईफलाईन्स वापरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे लाईफलाईन्सचा पर्याय उपलब्ध नव्हता. प्रश्नाचे अचूक उत्तर ठाऊक नसल्यामुळे दीपक जैन यांनी तेथेच थांबून खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना २५ हजार रुपयांसाठी विचारलेला प्रश्न:
सिक्कीममधील कोणत्या विधान सभा मतदारसंघामध्ये सर्व मतदार बौद्ध भिक्षू समाजामधले आहेत?
A. संघ
B. धर्म
C. कर्म
D. सूत्र
या प्रश्नाचे उत्तर ‘A संघ’ असे आहे. हा भाग येत्या काही दिवसामध्ये प्रसारित होणार आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या निर्मात्यांद्वारे ‘केबीसी ज्युनियर्स’ची घोषणा करण्यात आली आहे. या संबंधित व्हिडीओ सोनी चॅनलच्या इन्स्टाग्राम हँडलवर उपलब्ध आहे.