बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दरवर्षी सुपरहिट शो ‘कौन बनेगा करोडपती’मधून छोट्या पडद्यावर दिसतात. गेल्या २३ वर्षांपासून हा शो अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. फक्त या शोचं तिसरे पर्व सोडलं, तर इतर सर्व पर्व बच्चन यांनी होस्ट केली आहेत. आता ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वासाठी चाहते अधिक उत्सुक आहेत. या पर्वाचे नवीन प्रोमोज समोर येऊ लागले आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी अमिताभ बच्चन अत्यंत मानमोकळेपणाने गप्पा मारतात. या नव्या पर्वातही ते या स्पर्धकांशी हसत खेळत मनसोक्त गप्पा मारताना पाहायला मिळणार आहेत. या नव्या पर्वाच्या एका स्पर्धकाशी बोलल्यानंतर पुन्हा कधीच त्या स्पर्धकाशी भेट होऊ नये अशी प्रार्थना बिग बी यांनी नव्या प्रोमोमध्ये केलेली पाहायला मिळत आहे.
या नव्या पर्वाच्या एका भागात एक तरुण स्पर्धक बिग बी यांच्यासमोर बसला होता. इतर स्पर्शकांसाठी पहिला टप्पा हा १०००० रुपयांचा असतो पण या तरुणासाठी पहिला टप्पा ८०००० रुपयांचा असल्याचं त्याने स्पष्ट केलं. या स्पर्धकाची आणि त्याच्या कुटुंबियांची त्याने इन्कम टॅक्स ऑफिसर व्हावं अशी इच्छा आहे आणि यासाठी ज्या कोचिंगला जायचं त्याने ठरवलं आहे त्याची फी ही ८०००० रुपये आहे आणि किमान तेवढे पैसे घेऊनच घरी जायचं या उद्देशानेच तो स्पर्धक त्या हॉट सीटपर्यंत पोहोचल्याचं त्याने स्पष्ट केलं.
त्या स्पर्धकाची ही इच्छाशक्ति आणि जिद्द पाहून अमिताभ बच्चनही भारावून गेले. त्या स्पर्धकाने ८०००० रुपयांपेक्षा जास्त धनराशी जिंकून घरी जावं असंही बिग बी म्हणाले. याबरोबरच इन्कम टॅक्स अधिकारी होण्याच्या स्वप्नाबद्दल ऐकून बिग बी त्या स्पर्धकाला म्हणाले, “इथून पुढे आपली कधीच गाठभेट नको व्हायला अशी प्रार्थना करतो.” यावर अमिताभ बच्चनसह इतरही प्रेक्षकही मनमुराद हसले.
‘कौन बनेगा करोडपती’चं पहिलं पर्व २००० साली प्रसारित झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांच्या आवडत्या शोंच्या यादीत ‘कौन बनेगा करोडपती’ पहिल्या नंबरवर आहे. या शोचं फक्त तिसरं पर्व शाहरुख खाननं होस्ट केलं होतं. बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन आपल्या अंदाजात होस्ट करत आहेत.