‘कौन बनेगा करोडपती’चा १५ वा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचा एक वेगळाच अवतार आपल्याला पाहायला मिळतो. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांशी अमिताभ मनमोकळ्या गप्पा मारतात. आजही प्रेक्षक हा कार्यक्रम केवळ अमिताभ बच्चन यांच्यासाठीच बघतात. नुकत्याच शूट झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
बिग बी यांचा सुपरहीट चित्रपट ‘लावारीस’ प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. यातील त्यांनी गायलेलं ‘मेरे अंगने में’ हे गाणंही चांगलंच गाजलं. याच गाण्यामागील एक भन्नाट व मजेशीर किस्सा नुकताच बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर शेअर केला आहे.
आणखी वाचा : तीन अतरंगी मित्र, एक प्रेम कहाणी, पोलिस केस अन्… ‘तीन अडकून सीताराम’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित
‘केबीसी १५’च्या नव्या एपिसोडमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला अन् त्यादरम्यान ‘मेरे अंगने में’ या गाण्याची ऑडिओ क्लिप वाजवण्यात आली. अमिताभ यांनी लगेच ती बंद करायला लावली. ऑडिओ क्लिप पूर्ण झाल्यावर या गाण्यासंबंधीत एक धमाल किस्सा बिग बी यांनी शेअर केला. बिग बी म्हणाले, “या गाण्याचा एक मोठा इतिहास आहे. हे एक लोकगीत आहे अन् आम्ही ते लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आमचे वडील हे गाणं होळीच्या दरम्यान गायचे. प्रकाश मेहरा यांनी हे गाणं चित्रपटात घेण्याची इच्छा व्यक्त केली.”
हे गाणं चित्रपटात घेण्याबद्दल कोणाचीच काही हरकत नव्हती पण प्रकाश मेहरा यांना हे गाणं आमिताभ यांनी गायला हवं होतं. सर्वप्रथम अमिताभ यांनी नकार दिला. पुढे बिग बी म्हणाले, “प्रकाश मेहरा यांना माझ्या आवाजातच गाणं हवं होतं अन् त्यांनी मला सांगितलं की हे गाणं होळीला ज्या पद्धतीने गायलं जातं त्याच पद्धतीने सादर करायचं.” त्यानंतर प्रचंड मेहनत घेऊन बिग बी यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं अन् या गाण्याने इतिहास रचला.