‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या “वाह दादा वाह…” या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील डायलॉगने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हास्यजत्रेमुळे प्राजक्ताच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तिच्या अशाच एक चाहत्यामुळे तिला चक्क महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर झळकण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा : “हिंदू कायमच सहिष्णू होते आणि आहेत आता त्यांनीच ठरवलं की…”, जावेद अख्तर यांचं महत्वाचं विधान
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या इच्छा पूर्ण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या अजय नावाच्या एका स्पर्धकाने तो प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता आहे असं बिग बींना सांगितलं.
स्पर्धकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या आयोजकांना प्राजक्ता माळीला फोन लावण्यास सांगितलं. यानंतर प्राजक्ताला फोन लावल्यावर सर्वप्रथम अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीचं अभिवादन केलं. प्राजक्ताने अजयला चांगलं खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय तू जिंकलास, तर आपण नक्की भेटू असंही तिने अजयला सांगितलं. यानंतर महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजूने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले व तुम्ही असंच आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेम करत राहा असं त्यांना सांगितलं.
हेही वाचा : “पंखा साफ करायची वेळ…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरचं रोखठोक उत्तर; म्हणाला…
प्राजक्ता माळीने हा संपूर्ण व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री लिहिते, “काय सांगू किती भारी वाटलं! अशा पद्धतीनं ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात सहभागी होईन असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी नेहमी म्हणते…तुमचे चाहते तुमचा सर्वात मोठा आधार असतात. फक्त अजय मुळे ते शक्य झालं…केवळ प्रेम! सोनी मराठीची टीम सुद्धा यामुळे आनंदी झाली होती. त्यांनीही फार आनंदानं खूप सहकार्य केलं. त्यांचेही मनापासून आभार..आणि सरते शेवटी आमचे लाडके महाराष्ट्राची हास्यजत्रेचे अमित फाळके…अशा पद्धतीच्या कार्यक्रमात नेमकं काय-किती-कसं बोलावं याविषयी मनात अनेक प्रश्न होते, ज्यात त्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. मला लाभलेल्या या संधीसाठी त्यांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद.”
दरम्यान, प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत अभिनेत्रीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.