KBC 15 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या दमदार अभिनयाने कित्येक रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. चित्रपटांबरोबरच बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोच्या १५ व्या सीझनचे सूत्रसंचालनही करत आहेत. या शोमध्ये ते स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात. आता नुकताच त्यांनी या शोदरम्यान एयर फोर्सशी संबंधित एक धमाल आठवण सांगितली आहे.
बिग बी यांनी ‘केबीसी १५’च्या नव्या एपिसोडमध्ये ते एयर फोर्समध्ये का जाऊ शकले नाहीत याबद्दल खुलासा केला आहे. ‘केबीसी’च्या नव्या एपिसोडमध्ये एक स्पर्धक आला जो बीएससीचा विद्यार्थी आहे आणि त्याला पुढे एयर फोर्समध्ये भरती व्हायचं आहे असंही त्याने सांगितलं. त्या स्पर्धकाची इच्छा ऐकून बिग बी यांना स्वतःचं एक स्वप्न आठवलं.
आणखी वाचा : “पुढील १० वर्षं तुम्ही या चित्रपटाबद्दल…” किंग खानच्या ‘डंकी’बद्दल मुकेश छाब्रा यांचा मोठा खुलासा
त्यावेळी बिग बी यांनी सांगितलं की त्यांनाही एयर फोर्समध्ये जायची खूप इच्छा होती. याविषयी बोलताना बिग बी म्हणाले, “मी माझे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे काय करावे याबद्दल माझं काहीच ठरलेलं नव्हतं. मी माझ्या कुटुंबाबरोबर दिल्लीत राहायचो आणि एक आर्मी मेजर जनरल आमच्या घराजवळ राहायचे. ते एकदा आमच्या घरी आले आणि माझ्या वडिलांना मला त्यांच्याबरोबर पाठवायला सांगितले. अन् ते तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना मला सैन्यात मोठा अधिकारी बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला तेव्हा एयर फोर्समध्ये जायचे होते.”
पुढे बिग बी म्हणाले, “जेव्हा मी मुलाखतीसाठी गेलो तेव्हा त्यांनी मला माझे पाय लांब असल्याचं कारण देऊन रिजेक्ट केलं. केवळ पाय लांब असल्याने मला एयर फोर्समध्ये जाता आलं नाही याची मला खंत वाटते.” अशा पद्धतीने ‘केबीसी १५’मध्ये अमिताभ बच्चन त्यांच्याबद्दलची अशी माहिती प्रेक्षकांना देत असतात आणि खेळादरम्यान स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यात ते आणखी मदत करतात.