‘कौन बनेगा करोडपती १५’ च्या नव्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन खेळात सहभागी होणाऱ्या आणि होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांसह स्कॅम कॉल्सबद्दल बोलले आहेत. ज्या स्पर्धकांना या शोचा भाग व्हायचे आहे त्यांनी स्कॅम कॉल्सकडे लक्ष देऊ नये असे बिग बी यांनी बजावले. याशिवाय बिग बींनी सावधगिरीसाठी काय खबरदारी घ्यायला हवी याबद्दलही माहिती दिली.
बिग बी म्हणाले की या शोमध्ये केवळ ज्ञानाच्या आधारावरच प्रवेश दिला जातो. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पश्चिम बंगालमधील मंडल कुमार याने हॉट सीटपर्यंतचा प्रवास पार केला. भारतीय रेल्वेचे कर्मचारी म्हणून काम करणारे मंडल कुमारने खेळून ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. त्याने सांगितले की, त्याची मनापासून इच्छा होती की, आपल्या पत्नीला खेळादरम्यान प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांमध्ये पाहता यावे.
आणखी वाचा : रणबीर कपूर नव्हे तर ‘हा’ दाक्षिणात्य स्टार होता ‘अॅनिमल’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती
गेल्या १६ महिन्यांपासून ते दोघेही यासाठी प्रयत्न करत होते. या एपिसोडमध्ये मंडल यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. सध्या स्पर्धक या शोमध्ये सहभागी होण्याच्या इच्छेखातर बऱ्याच स्कॅम कॉल्सना बळी पडत आहेत.
इतकंच नव्हे तर मंडल कुमार यांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर अमिताभ यांनीदेखील सगळ्यांना जाहीर आवाहन केलं. बिग बी म्हणाले, “अशा स्कॅम कॉल्सकडे दुर्लक्ष करा. या घोटाळ्याच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक झाली आहे, काहींचे पैसे बुडाले आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका. शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात. त्यानंतर केवळ ज्ञानाच्या आधारेच त्यांची निवड केली जाते.”