‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. या मालिकेमध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूराणी यांची भूमिका साकारली होती. ही ऐतिहासिक मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.
आता अमोल कोल्हे व प्राजक्ता पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ऐतिहासिक नाटकामधून दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अमोल कोल्हे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
ती म्हणाली, “पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूराणीसाहेब. आजपासून सुरू होतंय ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य.” अमोल कोल्हे व प्राजक्ता यांचं ‘शिवपुत्र संभाजी’ हे नाटक आजपासून सुरू झालं आहे. यादरम्यानचाच फोटो प्राजक्ताने शेअर केला आहे.
संभाजीनगरमध्ये या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. याच संदर्भातील पोस्ट अमोल कोल्हेंनी शेअर केली होती. “पुन्हा तोच झंझावात ’शिवपुत्र संभाजी’ महानाट्य. दिनांक २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर, संभाजीनगर…तिकीट विक्री १ डिसेंबरपासून”, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.