Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji serial: अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट प्रसिद्ध झाल्यामुळे ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू आहे. छत्रपतींच्या इतिहासाबाबत आता नव्या पिढीकडून कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे. अशातच काही वर्षांपूर्वी अभिनेता आणि राजकारणी डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले. या प्रश्नांची उत्तरे आता खुद्द डॉ. अमोल कोल्हे यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्यासंदर्भात कुणाचा दबाव होता का? यामध्ये काही राजकीय हेतू होता का? आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ महाराजांचा अंत न दाखविण्यामागे शरद पवारांची काही विशेष सूचना होती का? या चार प्रश्नांची उत्तरे डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहेत.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपून आता पाच वर्षांहून अधिकचा काळ झाला. तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. या यशात चाहत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या थिएटरमध्ये असलेला छावा चित्रपट अतिशय उत्तम आहे. तो पाहण्याचे मी आवाहन केलेले आहेच. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्ष दडवलेला इतिहास समोर येत आहे. अंधाऱ्या कोठडीत डांबला गेलेला इतिहास यानिमित्ताने उजळून निघाला. पण सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी या ट्रोलर्सना फारशी किंमत देत नाही. पण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे उत्तर देणे भाग वाटते.
मालिकेचा शेवट बदलण्यात माझ्यावर दबाव होता
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्याचा माझ्यावर दबाव होता, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत. पण हा दबाव माध्यमांचा होता. कारण सदर मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होत होती. त्यामुळे रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवले जावे, याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखविण्यात आल्याचे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
शरद पवारांनी शेवट बदलण्यास सांगितले का?
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मालिकेचा शेवट बदलण्यास सांगितले का? याबद्दल बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार यांनी कधीही अमुक प्रसंग असा दाखवा किंवा तसा दाखवू नका, याबद्दल एका शब्दानीही सांगितलेले नव्हते. किंबहुना शरद पवार यांनी तेव्हा मालिका पाहिलेलीच नव्हती. करोना काळात जेव्हा मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आले, तेव्हा शरद पवार यांनी पहिल्यांदा संपूर्ण मालिका पाहिली. त्यामुळे कुणाला तरी खूश करण्यासाठी मालिकेचा शेवट बदलला, हा धादांत खोटा प्रचार आहे.