‘अमृत मंथन’ फेम अभिनेत्री डिंपल झांगियानी लग्नानंतर ८ वर्षांनी आई झाली आहे. तिने आपल्या लाडक्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. डिंपलने डिसेंबर २०१६ मध्ये हिरे व्यापारी सनी असरानीशी लग्न केलं होतं. तिने १ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं. या जोडप्याने आपल्या लेकीचं नाव फारच खास ठेवलं आहे.
डिंपल व सनी यांनी त्यांच्या मुलीचे नाव शिवोना ठेवले आहे. या नावाबद्दल डिंपल म्हणाली, “आम्हाला वाटलं की मुलगा होईल, त्यामुळे आम्ही तशी तयारी केली होती. पण तरीही आम्ही मुलीचं एक नावही शॉर्टलिस्ट केलं होते. आम्ही आमच्या मुलीचं नाव शिवोना ठेवलं आहे. हे नाव भगवान शंकरापासून प्रेरित आहे. आम्ही सगळे शिवभक्त आहोत आणि शिवोना हे नाव कॉमन नाही.”
डिंपलने इ-टाइम्सशी बोलताना तिचा मातृत्वाचा प्रवास कसा होता ते सांगितलं. “बाळ होऊ देण्याआधी सनी आणि मला एकत्र वेळ घालवायचा होता. नंतर आम्ही बाळाचं प्लॅनिंग केलं, पण त्यात आम्हाला बऱ्याच अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागला. कोणतीही वैद्यकीय समस्या नव्हती, तरीही मी गरोदर राहत नव्हते. त्यामुळे आम्ही खूप तणावात होतो. पण देव योग्य वेळी आशीर्वाद देतो, असा माझा विश्वास आहे आणि तेच घडलं. आई होणं हे माझं स्वप्न होतं. माझ्या आजूबाजुला असलेल्या लोकांना माहीत आहे की मला लहान मुलं किती आवडतात. मी प्रेग्नेन्सी टेस्ट किटवर पॉझिटिव्ह साइन पाहिल्यानंतर मला विश्वासच बसत नव्हता. नंतर आम्ही सगळ्या चाचण्या करून मी गरोदर असल्याची खात्री करून घेतली,” असं डिंपलने सांगितलं.
पुढे डिंपल म्हणाली, “ते नऊ महिने खूप कठीण होते. मी पूर्णपणे अंथरुणावर होते. मला खूप त्रास झाला. जेवणं जायचं नाही, मळमळ व्हायची. पहिले चार महिने मला द्रवपदार्थांवर होते. पण आता, आयुष्याच्या या नवीन टप्प्यात मी माझ्या गरोदरपणात जे काही करू शकले नाही ते सर्व सेलिब्रेशन करण्याची माझी इच्छा आहे.”
डिंपल झांगियानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘कुछ इस तारा’, ‘अमृत मंथन’, ‘तुम्ही हो बंधू सखा तुम्ही’, ‘राजा की आएगी बारात’, ‘मिसेस पम्मी प्यारेलाल’, ‘बेइंतहा’, ‘किस देश मे है मेरा दिल’, ‘हम दोनो है अलग अलग’ या मालिकांसाठी ओळखली जाते.