उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये हजेरी लावली. शोचा निवेदक अवधूत गुप्तेने देवेंद्र फडणवीसांना राजकीय व वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची फडणवीसांनी मनमोकळेपणाने उत्तर दिली. यावेळी त्यांनी त्यांना खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या. तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांच्या खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला देवेंद्रजींबद्दल काय खुपतं? याचं उत्तर मी मजेशीर देऊ शकले असते, पण मी ही संधी साधतेय त्यांना परत आठवून देण्यासाठी की देवेंद्रजी तुम्ही लोकसेवेत खूप व्यग्र आहात, पण मला वाटतं की तुम्ही स्वतःसाठी आणि महाराष्ट्रासाठीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कितीही वाजता झोपणं, अवेळी झोपणं, कमी झोप घेणं, जिथे जे मिळेल ते खाणं, व्यायामासाठी वेळ न मिळणं या गोष्टी दीर्घकाळासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे लेक्चर मी नेहमी ऐकतो. मी नेहमी म्हणतो की आता १५-२० दिवसांनी मी व्यायाम सुरू करतो. एक तर तो सुरूच होत नाही आणि केला तर ३-४ महिन्यांवर टिकत नाही. मी वेळेवर जेवेण असं म्हणतो, तेही १५-२० दिवस होतं मग पुन्हा सुटतं. त्यामुळे हा चक्रव्ह्यू सातत्याने चालू असतो.”
कार्यक्रमाचा निवेदक अवधूत गुप्ते यावर म्हणाला, “वहिनी मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळी जेव्हा मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो होतो, त्याच्यापेक्षा आता ते बारीक झालेले दिसत आहेत. अजून फ्रेश व यंग दिसत आहेत.”