‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच अमृता उत्तम नृत्य करते याची कल्पना आपल्याला आहेच मात्र, मध्यंतरी एका युट्यूब चॅनेलवर भारुड सादर करत अमृताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने सादर केलेल्या भारुडाची चांगलीच चर्चा रंगली होती. युट्यूबनंतर आता थेट एका पुरस्कार सोहळ्यात अमृता भारुड सादर करताना दिसणार आहे.
हेही वाचा : “डोक्यावर टक्कल, हातात बंदूक अन्…”, ‘जवान’साठी फक्त ३० दिवस बाकी, शाहरुख खानने शेअर केलं नवं पोस्टर
अभिनेत्री अमृता खानविलकर ‘झी मराठी’ वाहिनीवर संपन्न होणाऱ्या ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळ्यात भारुड सादर करुन रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हे अनोखे सादरीकरण करताना अमृताला ‘अभंग रिपोस्ट’ हा म्युझिकल बॅंड साथ देणार आहे.
अमृताने यापूर्वीचे ‘अक्कल येऊ दे’ हे भारुड ‘अभंग रिपोस्ट’ या टीमबरोबर सादर केले होते. ‘उंच माझा झोका पुरस्कार’ हे समाजातील गुणवंत, समाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या स्त्रियांना दरवर्षी दिले जातात. या पुरस्कार सोहळ्यात स्त्रियांच्या दैनंदिन विषयांवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाते. अमृता, “मला दादला नको गं बाई, मला नवरा नको बाई…” हे सांप्रदायिक भारुड एका नव्या रुपात सादर करणार आहे.
हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, परदेशात सुट्टीवर गेली असताना घडली घटना
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवारी २७ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. अभिनेत्रीने या भारुडाचा लहानसा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी अमृताचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.