Bigg Boss Marathi Season 5 : जसजसा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा जवळ येत आहे, तसतसा हा लोकप्रिय कार्यक्रम रंगदार होतं चालला आहे. शेवटच्या टप्प्यात आलेलं हे पर्व ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या या पाचव्या पर्वात आणखीन रंग भरण्यासाठी आधीच्या पर्वातील गाजलेले चेहरे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील राखी सावंत, दुसऱ्या पर्वातील अभिजीत बिचुकले यांच्यानंतर आता पहिलं पर्व गाजवलेले पत्रकार अनिल थत्ते यांची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री झाली आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘भाऊच्या धक्क्या’वरील अनिल थत्तेंचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये हात जोडत अनिल थत्ते ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. प्रवेश करताच त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये वर्षा उसगांवकर आणि निक्कीशी त्यांनी संवाद साधला आहे. यावेळी निक्कीचं ते कौतुक करताना दिसत आहेत.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी ५’नंतर इरिना रुडाकोवाला मिळाली मोठी संधी, झळकली ‘या’ लोकप्रिय मालिकेत
या प्रोमोमध्ये सुरुवातीला ‘बिग बॉस’ अनिल थत्तेंचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ म्हणतात, “आता घरात अशी एक व्यक्ती येत आहे; ज्यांच्या विधानांनी नेहमीच खळबळ उडते.” त्यानंतर अनिल थत्ते वर्षा उसगांवकरांना म्हणतात, “वर्षा…मी ताई वगैरे म्हणणार नाही. तरुणपणाची ड्रीम गर्ल ही होती.” पुढे निक्कीचं कौतुक करत अनिल म्हणतात की, निक्की तू युनिक आहेस. तुझ्याशिवाय ‘बिग बॉस’ आम्ही कल्पना करू शकत नाही. यावर निक्की हात जोडून त्यांचे आभार मानताना दिसत आहे.
हेही वाचा – Video: अभिजीत सावंतच्या लव्हस्टोरीला ‘अशी’ झाली होती सुरुवात, बायकोला ‘हे’ दिलं होतं पहिलं गिफ्ट
दरम्यान, अनिल थत्तेंच्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बरोबर…निक्कीने कंटेंट दिला आहे. बाकी सगळे तर पिकनिक गँग होती.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “निक्की विजयी होण्यास पात्र आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “निक्की टीआरपी क्विन आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd