‘बिग बॉस १७’ हा शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. शो सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. या शोमध्ये ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. पण या शोमध्ये दोघांचे रुसवे, फुगवे आणि भांडणं पाहायला मिळतात. आता नुकत्याच झालेल्या भांडणानंतर अंकिताने पतीला घटस्फोट मागितला आहे.
अंकिता अनेकदा विकीशी भांडताना विभक्त होण्याबाबात बोलत असते. आता ताज्या भागात अंकिताने आयशा खानसमोर घटस्फोटाबाबत विधान केलं आहे. झालं असं की विकी जैन, अंकिता लोखंडे आणि आयेशा खान लग्नाविषयी बोलत होते. यादरम्यान विकी लग्नाबद्दल आपलं मत मांडतो. ‘विवाहित पुरुषांना किती त्रास होतो हे ते कधीच मान्य करत नाहीत.’ यावर आयशा खान म्हणते की तिला कधीच लग्न करायचं नाही आणि याचे कारण तिचे वडील आहेत. या संपूर्ण संभाषणानंतर अंकिता विकीला विचारते की तो आयशाला असं का बोलला? तेव्हा विकी म्हणाला, ‘मला कसं वाटतंय हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक…विशेषतः पुरुषच या परिस्थितीतून जातात’.
विकी जैनच्या बोलण्यामुळे अंकिता लोखंडे चिडते. तिला राग येतो आणि ती थेट घटस्फोटाबाबत बोलते, जे ऐकून आयशा खानलाही धक्का बसतो. “तुला इतका त्रास होतोय तर मग तू माझ्यासोबत का आहेस? घटस्फोट घे ना, मला तुझ्यासोबत घरी परत जायचं नाही,” असं अंकिता लोखंडे पतीला म्हणते. त्यानंतर ती रागात तिथून निघून जाते.
“हीन दर्जाचा…”, ‘जवान’ मधील शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया
दरम्यान, यापूर्वीही अंकिता व विकी जैनची अनेकदा भांडणं झाली आहेत. एकदा अंकिताने त्याला चप्पल फेकून मारली होती. तर त्यापूर्वी एका भांडणार ती विकीवर संतापली होती. आपलं लग्न झालंय हे विसरून जा, असंही ती विकीला म्हणाली होती. त्यानंतर या दोघांच्या आई शोमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी या दोघांची समजूत काढली होती.