अंकिता लोखंडेसाठी ‘बिग बॉस १७’ चा प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला. या शोमध्ये ती पती विकी जैनबरोबर सहभागी झाली होती. या प्रवासात त्या दोघांची खूप भांडणं पाहायला मिळाली. शो संपल्यानंतर आता सगळं सुरळीत असलं तरी शोमध्ये त्यांची भांडणं पाहून हे दोघे एकत्र राहतील की नाही, अशी चर्चा चालू झाली होती. दोघांच्या भांडणातून चुकीचा संदेश बाहेर जात होता. शेवटी त्यांच्या कुटुंबियांना यात हस्तक्षेप करावा लागला.
या शोच्या फॅमिली वीकमध्ये अंकिता व तिच्या सासूबाई रंजना जैन थेरपी रूममध्ये एकत्र गेल्या होती. यावेळी रंजना यांनी अंकिताला विकीला मारण्याबाबत विचारताना काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या तिच्या वडिलांचा उल्लेख केला. विकी आई इतक्यावरच थांबली नाही तर घराबाहेर पडल्यानंतर त्या अंकिताबद्दल मीडियाशी वाईट बोलल्या. यामुळे मोठा गोंधळ झाला. आता ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तिच्या सासूच्या कृतीचे समर्थन करत अंकिता म्हणाली, “आजपर्यंत लोकांनी या प्रकरणावर आपापली मतं मांडली आहेत. पण जे काही घडलं ते सर्वांसमोर असल्याने मी त्यांना थांबवणार नाही. ही माझ्यासाठी कौटुंबिक गोष्ट आहे, जर काही गोष्टी मला शोमध्ये म्हटल्या गेल्या तर मला माहित आहे की त्यांचा हेतू तसा नव्हता. मी या लोकांबरोबर राहिले आहे आणि ते माझ्यावर किती प्रेम करतात हे मला माहीत आहे, पण बिग बॉसमध्ये आई (सासूबाई) थोड्या भावुक झाल्या.”
पुढे ती म्हणाली, “माझ्या सासूबाई माझ्यासारख्याच आहेत, त्या तोंडावर बोलतात, पण त्यांचा हेतू वाईट नव्हता. जोपर्यंत कुटुंबाच्या नकारात्मक प्रतिमेचा प्रश्न आहे, त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आता मी आहे. त्या घरात मी नेहमीच खूप आनंदी राहिले आहे. आजही मी खूप आनंदी आहे आणि भविष्यातही असेनच. लोकांना काय म्हणायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल मी काहीही करू शकत नाही.”
सासूबाईंच्या वागणुकीबद्दल अंकिता म्हणाली, “त्यांनी (सासूबाईंनी) पहिल्यांदा विकीला रडताना पाहिलं. तो खूप मजबूत आहे, पण त्याला रडताना पाहून त्यांना वाईट वाटलं. त्यामुळेच कदाचित त्यांनी त्या सर्व गोष्टी म्हटल्या असतील. पण त्याचा काही फरक पडत नाही, मी परत आल्यानंतर, आम्ही भेटलो आणि त्यावर कोणतेही प्रश्न विचारले गेले नाही किंवा चर्चा झाली नाही. त्या गोष्टी पुन्हा समोर आणून मी त्यांचा अनादर करू शकत नाही, आम्ही दोघेही त्या गोष्टी मागे सोडून दिल्या आहेत.”
शोच्या शेवटच्या दिवशी विकीच्या आईने अंकिताला वचन देण्यास सांगितलं होतं की ती कधीही असा शो करणार नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा खराब होईल. तसेच अंकिताने विकीला मारलं होतं आणि शिव्या दिल्या होत्या, त्यावरूनही तिच्या सासूबाई नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं.