टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसचा १७ वा सीझन नुकताच संपला. स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यंदाच्या बिग बॉसचा विजेता ठरला. दरम्यान, यंदाच्या बिग बॉसमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैनने. शोच्या सुरुवातीपासूनच दोघांमध्ये टोकाचे वाद होताना बघायला मिळाले होते.
‘बिग बॉस’मुळे विकीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. विकीने ‘बिग बॉस १७’ जिंकावे अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, महाअंतिम सोहळ्याअगोदरच विकी बाहेर पडला अन् अनेकांचा हिरमोड झाला. मात्र, आता ‘बिग बॉस’नंतर विकी जैनला मोठी संधी मिळाली आहे. विकीला ‘बिग बॉस ओटीटी ३’साठी ऑफर देण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अगामी बिग बॉस ओटीटी ३ मध्ये विकी दिसणार की नाही याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व चांगलेच गाजले होते. या पर्वात एल्विश यादव, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, विनाश सचदेव, जैद हदीद, फलक नाझ यांचा समावेश होता. एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता ठरला होता, तर अभिषेक मल्हान उपविजेता ठरला. अभिषेक व एल्विश यादव यांच्यात चुरस रंगली होती. एल्विशने वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड सदस्य विजयी झाला. आता लवकरच ‘बिग बॉस ओटीटी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
‘बिग बॉस १७’ नंतर अंकिता लोखंडेच्या हातीही मोठा प्रोजेक्ट लागला आहे. लवकरच ती ‘सावरकर’ चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारणार आहे. येत्या २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.