छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. या शोमध्ये अनेकदा ती तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसते. आता अंकिताने सुशांतच्या शेवटच्या क्षणांबाबत भाष्य केले आहे.
‘बिग बॉस’च्या घरामध्ये मुन्नवर फारूकीबरोबर बोलताना अंकिताने सुशांतच्या शेवटच्या दिवसांबाबत वक्तव्य केले आहे. अंकिता म्हणाली, “माझे व सुशांतचे ब्रेकअप २६ फेब्रुवारीला झाले. ‘पवित्र रिश्ता’ मालिका सुरू झाल्याच्या अवघ्या एक महिन्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आम्ही एक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. सुशांतच्या शेवटच्या क्षणांची आठवण करीत अंकिता म्हणाली, “जेव्हा मी त्याचा शेवटचा तो फोटो पाहिला तेव्हा मला वाटलं की, सर्व काही संपलं आहे. त्याचा तो फोटो खूप भयानक होता. तो फोटो बघून माझे हात-पाय थंड पडले होते. तो झोपला आहे असं वाटतं होतं.”
अंकिता पुढे म्हणाली, “तो फोटो बघून मला कल्पना आली होती की, शेवटच्या क्षणी त्याच्या मनात काय काय चाललं असेल. कारण- मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यामुळे कोणत्या तरी गोष्टीवरून त्याला खूप त्रास झाला आहे, असं वाटतं होतं. तो पूर्णपणे खचला होता. सगळं संपल्यासारखं वाटलं. असं व्हायला नको होतं.”
अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये एकत्र दिसले होते. दोघे सात वर्षं रिलेशनशिपमध्ये होते; पण २०१६ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येमुळे अंकिताला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या धक्क्यातून सावरल्यानंतर अंकिताने २०२१ मध्ये तिचा जवळचा मित्र विक्की जैन याच्याबरोबर लग्नगाठ बांधली.