‘बिग बॉस’च्या १७ वे पर्व दिवसेंदिवस रंजक होत चालले आहे. या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट केलं होतं. या शोमध्ये बऱ्याचदा ती सुशांतबद्दल बोलताना दिसते. तिने काही दिवसांपूर्वी सुशांतबरोबरच्या ब्रेकअपवरही भाष्य केलं होतं.
अंकिता लोखंडेची सुशांतशी ब्रेकअपनंतर झालेली ‘अशी’ अवस्था, म्हणाली, “मी विकीला म्हणायचे की तो…”
अंकिता व सुशांत यांनी साधारणपणे एकत्रच करिअरला सुरुवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. एकत्र काम करताना ते प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांना तब्बल सात वर्षे डेट केलं. ब्रेकअप झाल्यानंतर सगळं काही नीट होईल, यासाठी आपण सुशांतची अडीच वर्षे वाट पाहिली, असा खुलासा अंकिताने केला आहे.
‘बीबीसी न्यूज हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणालेली, “अडीच वर्षे मला आशा होती की सर्व काही ठीक होईल. पण एके दिवशी, तो ३१ जानेवारीचा दिवस होता… माझ्या घरी आम्हा दोघांचे खूप फोटो होते. आणि त्या दिवशी मी ठरवलं आणि आईला सांगितलं की सगळे फोटो काढून टाक. मी म्हणाले की आयुष्यात दुसरं कुणीतरी यावं, यासाठी आधीची जागा रिकामी करायला हवी.”
अंकिताने सांगितल्याप्रमाणे तिच्या आईने सर्व फोटो काढले व फाडून टाकले. “मी माझ्या आईला सांगितलं की तो (सुशांत) इथे आहे तोपर्यंत कोणीही माझ्या आयुष्यात येऊ शकणार नाही. मी फोटो काढले नाही, मी फक्त माझ्या आईला सांगितले. मी माझ्या खोलीत गेले, माझ्या आईने फोटो काढले आणि फाडले. त्या दिवशी मी खूप रडले. पण तोच आमच्या नात्याचा, वाट पाहण्याचा शेवट होता. मी त्याची खूप वाट पाहिली, तो आला नाही, नंतर ६ महिन्यांनी विकी माझ्या आयुष्यात आला,” असं ती म्हणाली.
‘बिग बॉस’मध्ये काही दिवसांपूर्वीच अंकिता सुशांतबद्दल बोलली होती. सुशांतबरोबरचं तिचं नातं एका रात्रीत संपलं. “तो एक दिवस अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्याला यश मिळत होते म्हणून लोक त्याला बरंच काही सांगून त्याचं मत बदलत होते आणि तो त्यांचं ऐकत होता”, असं अंकिताने मुनावरला सांगितलं होतं. दरम्यान, सुशांत गेल्यानंतर तिच्या आयुष्यात विकीची एंट्री झाली, त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.