Ankita Walawalkar Kelvan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून अंकिता वालावलकर घराघरांत लोकप्रिय झाली. शोमध्ये सहभागी झाल्यावर अंकिताने पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’ संपल्यावर लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. महाअंतिम सोहळा पार पडल्यावर अंकिताला सर्वत्र लग्नाविषयीचे प्रश्न विचारले जात होते. अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोकण हार्टेड गर्लने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हिल करत, लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं.
अंकिता आणि कुणाल येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिता आणि कुणाल यांचं पहिलं केळवण नुकतंच पार पडलं आहे. याचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
पहिल्या केळवणासाठी अंकिता व कुणालने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. या जोडप्यासाठी नातेवाईंकांनी खास जेवणाचा बेत केला होता. फुलांची सजावट करुन मधोमध केळीच्या पानावर ‘केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं. मात्र, या दोघांनी अद्याप लग्नाची तारीख उघड केलेली नाही. त्यामुळे अंकिता नेमकी केव्हा विवाहबंधनात अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा : एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
अंकिताने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नपत्रिकेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. या जोडप्याच्या लग्नपत्रिकेला केळीच्या पानाची डिझाइन करण्यात आली आहे. अंकिताने परंपरेनुसार सर्वप्रथम गावच्या मंदिरात आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली होती.
कुणालने लोकप्रिय मालिकांना दिलंय संगीत
अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर कुणाल भगत मराठी सिनेविश्वात सक्रिय आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटासाठी त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. याशिवाय ‘झी मराठी’ची मालिका ‘लक्ष्मी निवास’, आगामी मालिका ‘तुला जपणार आहे’ यांनाही कुणालने संगीत दिलेलं आहे. कुणाल-करण अशी या संगीतकारांची जोडी असून, या दोघांनी मिळून अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केलेलं आहे. दरम्यान, आता पहिलं केळवण पार पडल्यावर अंकिता लग्नबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.