Bigg Boss Marathi Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अंकिता वालावलकर यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. या शोमुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अगदी सीझन संपताना तिला ‘बिग बॉस’ने ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’ असा टॅग दिला होता. सुरुवातीला काहीशी बॅकफूटवर खेळणारी अंकिता हळुहळू ‘बिग बॉस’च्या घरात पूर्णपणे मिसळली आणि शेवटी टॉप-५ पर्यंत पोहोचली.
अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar ) पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण, यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर सूरज जिंकल्याचा आनंद खूप मोठ्या प्रमाणात होता. सोशल मीडिया स्टार असल्याने अंकिताचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. यावर विविध प्रकारचे व्हिडीओ, डेली Vlogs टाकून ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते. ‘बिग बॉस’ संपल्यावर आता अंकिता पुन्हा एकदा कामावर परतली आहे. तिने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत तिचा शोमधील प्रवास थोडक्यात उलगडला आहे. याशिवाय आता लवकरच एक सविस्तर व्हिडीओ करून तुमच्या गप्पा मारेन असं देखील तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे.
अंकिताने मांडलं स्पष्ट मत
अंकिता (Ankita Walawalkar ) म्हणते, “खरं सांगू तर बाहेर आल्यावर मी ‘बिग बॉस’चा एकही एपिसोड पाहिलेला नाही. पण, घरच्यांच्या बोलण्यावरून आणि विशेषत: माझ्या बहिणी मला जे प्रश्न विचारत आहेत आणि कुणाल ( होणारा नवरा ) सुद्धा बरंच काय-काय विचारतोय… यावरून मला एक अंदाज आला की, बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत. जर सीझन मी पुन्हा पाहिला तर, माझं डोकं फिरेल… तोंडावर चिकटपट्टी लावण्याची पाळी येईल त्यामुळे मी तो सीझन न बघणं हाच एक चांगला उपाय आहे.”
‘पाणी’ चित्रपटाच्या प्रीमियरला अंकिताने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह उपस्थिती लावली होती. यावेळी तिची भेट महेश मांजरेकरांशी झाली. यावर अंकिता म्हणाली, “मी नुकतीच महेश सरांना भेटले आणि त्यांना भेटल्यावर मला खरंच खूप छान वाटलं. कारण, मी काही चुकीचं वागले नाहीये ना? हे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं, त्या गेममध्ये मी चुकत तर, नव्हते ना? महेश सरांनी मला जे-जे सांगितलं, त्यावरून जाणवलं अरे मी बरोबर होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलून मला एक वेगळा आत्मविश्वास आला आहे.”
दरम्यान, आता अंकिताला ( Ankita Walawalkar ) येत्या काळात नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. याशिवाय आता ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ लवकरच कुणाल भगतबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. प्रेक्षकांना याबद्दल सगळी माहिती देईन असं तिने व्हिडीओच्या शेवटी सांगितलं.