Ankita Walawalkar Pre-Wedding Shoot : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात आता अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी अंकिता लग्न करणार आहे. सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड चालू आहे. अंकिताने सुद्धा कोकणात प्री-वेडिंग शूट केलं आहे. मात्र, तिचं प्री-वेडिंग काहीस अनोखं आणि इतरांपेक्षा आगळंवेगळं आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे पाहुयात…
सुंदर आणि वेगवेगळे ड्रेस घालून नयनरम्य ठिकाणी लग्नाआधी जाऊन फोटोशूट करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात सुरू झालेला आहे. अंकिताने सुद्धा प्री-वेडिंग शूट केलंय पण, काहीसं वेगळं…कारण, अंकिताच्या प्री-वेडिंग व्हिडीओमध्ये तिचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. आई-बाबा, दोन्ही बहिणी आणि होणारा नवरा कुणाल असे सगळेजण या शूटमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी लेकीचा आनंद पाहून अंकिताच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना नकळत डोळे पाणावतात अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
प्री-वेडिंगचा व्हिडीओ शेअर करत अंकिता लिहिते, “सुरुवातीला कुठे होतं प्री-वेडिंग… पण, लग्न टिकलीच ना? आतापेक्षा तरी जास्तच… सगळ्याच गोष्टी इतरांसारख्या केल्या तरच आपल्याला समाजात स्थान मिळेल असं नाही… आयुष्य ज्या व्यक्तीबरोबर घालवणार त्या व्यक्तीबरोबरचं Photoshoot म्हणजे प्री-वेडिंग नव्हे तर आपल्या मनात असलेल्या सगळ्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करणं आणि नवीन आयुष्याकडे वळणं हे खरं प्री वेडिंग… इतर लोक जे करतात ते आपण फक्त पाहत राहावे. मी असं म्हणणार नाही की, तुम्ही हेच करा पण करून बघायला काय हरकत आहे? बाकी कसं वाटलं माझं प्री वेडिंग?”
दरम्यान, “डोळ्याचे काठ अलगद पाणावले. लग्न म्हणजे दोन मनांचं नसून दोन कुटुंबांचा संगम आहे”, “आई वडिलांच्या डोळ्यातले भाव सर्व सांगून जात आहेत अंकिता…की आपल्या मुलीची निवड योग्य आहे.”, “अप्रतिम बोलायला आणि लिहायला शब्द ही तोकडे पडतील” अशा असंख्य कमेंट्स करत अंकिताच्या या आगळ्यावेगळ्या प्री-वेडिंग शूटचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.