Kokan Hearted Girl Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाल्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरला महाराष्ट्राच्या घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शोमध्ये असतानाच अंकिताने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय महाअंतिम सोहळा पार पडल्यावर अंकिताने फेब्रुवारी महिन्यात कोकणात लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ फेब्रुवारीला ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता व कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात थाटामाटात पार पडला. या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. थाटामाटात लग्न केल्यावर अंकिता वालावलकर आता कुणालच्या घरी म्हणजे सासरी पोहोचली आहे. कुणालच्या माणगावच्या घरी अंकिताचं जय्यत स्वागत करण्यात आलं.

अंकिताने “माणगावच्या घरी गृहप्रवेश” असं कॅप्शन देत तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, कपाळावर मुंडावळ्या व लहानशी टिकली या नव्या नवरीच्या रुपात अंकिता खूपच सुंदर दिसतेय. माप ओलांडून कुणालच्या घरी प्रवेश करण्याआधी अंकिताने सर्वात आधी उखाणा घेतला. याठिकाणी तिच्यासाठी खास फुलांची सजावट करण्यात आली होती.

अंकिता उखाणा घेत म्हणते, “समुद्रकिनारी जुळल्या गाठी कुणालचं नाव घेते साता जन्मासाठी!” तर, कुणालने “सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी” असा खास उखाणा आपल्या बायकोसाठी घेतला आहे. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने कुणालने ‘कोकणपरी’ हे गाणं खास अंकितासाठी लिहिलंय. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

अंकिताने शेअर केलेल्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अभिनेत्री मेघा धाडे, गायिका सावनी रविंद्र यांच्यासह काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखला जातो. ‘येक नंबर’ या सिनेमासाठी कुणालने संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्याने संगीत दिलं आहे. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.