‘बिग बॉस मराठी ५’फेम अंकिता वालावलकर ही नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांनी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून बाहेर पडल्यानंतर अंकिता व कुणालने त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच लग्न कऱण्याचा निर्णयदेखील जाहीर केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता व कुणालने त्यांच्या प्रेमी जीवनाबद्दलची माहिती दिली आहे. तसेच लग्नासाठी आधी अंकिता नकार देत होती, असेही वक्तव्य कुणालने केले.

त्यानं मला लग्नासाठी…

अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत या जोडप्याने त्यांची पहिल्यांदा भेट कधी झाली, ते कसे भेटले आणि घरी कधी सांगितले, याबद्दल वक्तव्य केले आहे. जेव्हा कुणालने लग्नासाठी विचारले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती, यावरही अंकिताने वक्तव्य केले. अंकिता म्हणाली, “आम्ही बाहेर भेटू शकत नव्हतो. आम्ही खूप रात्री चिंतामणीच्या मंडपासमोर आमच्या गाडीतच बसायचो. समोर मंडप असायचा आणि आम्ही गप्पा मारायचो. तिथेच त्यानं मला लग्नासाठी विचारलं होतं. मी त्याला नाही म्हणायचे. मी त्याला सांगायचे की, मला लग्न करायचं नाहीये. तू शोध दुसरी कोणीतरी मुलगी, मला लग्न करायचं नाही.

कुणाल पुढे म्हणाला, “म्हणजे लग्नाबद्दल ती खूप नकारात्मक होती. म्हणजे तिचे काही पॉइंट्स होते. त्यामुळे ती लग्नाबद्दल नकारात्मक होती. मग एकेक पॉइंट कट करत करत मी तिला सकारात्मक केलं.” अंकिता पुढे म्हणाली, “सगळ्यात शेवटी त्यानं मला विचारलं की, आता असं काय कारण आहे, ज्यामुळे तुला वाटतं की, लग्न करायचं नाही? त्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. माझ्याकडे कोणताच मुद्दा किंवा पॉइंट नव्हता की, ज्यामुळे मी सांगू शकेन की, मला लग्न करायचं नाहीये. मग तो मला म्हणाला की तू चिंतामणीला मानतेस ना, मग चिंतामणीला सांग ना. मग मी देवाला असं म्हणाले की, जर माझ्या आयुष्यात चांगलं काही होणार असेल आणि आम्ही दोघं छान राहू शकणार असू, तर प्लीज या गोष्टी पुढे जाऊ देत. त्यावर तो खूश झाला होता.”

अंकिताने लग्नाला होकार देण्याआधी किती वेळा तिने नकार दिला होता? यावर कुणाला म्हणाला, “नकार म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की, मला लग्न करायचं नाही. मला ती नाही म्हणत नव्हती. आई-बाबांचा आणि इतर गोष्टींचा सगळ्यांचाच विचार करायची. मी म्हणायचो की तू ठाम हो. बाकीचं मी बघतो. विचारल्यानंतर सात-आठ महिन्यांनी होकार मिळाला.” अंकिता पुढे म्हणाली, “मला आता वाईट वाटतं की, तो एकटाच ठाम होता. मी त्याला असं म्हणायचे की, दुसरी मुलगी शोध. आज सगळं जे काही छान झालं आहे, ते त्याच्यामुळे झालं आहे. त्यानं खूप प्रयत्न केले.”