Ankita Walawalkar First Kelvan : अंकिता वालावलकरची सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तिला सर्वत्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून ती घराघरांत लोकप्रिय झाली. अंकिताच्या लग्नासाठी तिचे सगळेच चाहते उत्सुक आहेत. तिचं पहिलं केळवण नुकतंच पार पडलं आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या घरच्या पहिल्या केळवणाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यावेळी अंकिता आणि कुणालने एकमेकांसाठी खास उखाणे देखील घेतल्याचं पाहायला मिळालं.
अंकिताच्या केळवणासाठी तिच्या कुटुंबीयांनी आकर्षक सजावट केली होती. अंकिता व कुणाल यांच्या नावाच्या रांगोळ्या काढून जेवणाच्या ताटाच्या बाजूला फुलांची सजावट करण्यात आली होती. यानंतर या जोडप्याचं औक्षण करण्यात आलं. जेवणासाठी खास मोदक, बासुंदी, भाजी-चपाती, पुलाव असा मेन्यू करण्यात आला होता. अंकिता व कुणालने एकमेकांना मोदक भरवला आणि उखाणे घेतले.
कुणालने घेतला हटके उखाणा
अंकिता उखाणा घेत म्हणाली, “समोर आहे बासुंदी खायची झालीये मला घाई, कुणालचं नाव घेते सुरू झाली लगीनघाई.” मात्र, कुणालचा उखाणा एकदम हटके आणि लक्षवेधी ठरला. कुणाल म्हणाला, “पाटावर पाट, पाटाखाली भुंगा, वालावलकरांची पोरगी पटवली ढांगचिकढींगा”
अंकिताने या व्हिडीओला ‘घरचं पहिलं केळवण’ असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांसह अंकिताच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कुणाल भगतबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटासाठी त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. याशिवाय ‘झी मराठी’ची मालिका ‘लक्ष्मी निवास’, आगामी मालिका ‘तुला जपणार आहे’ यांनाही कुणालने संगीत दिलेलं आहे. कुणाल-करण अशी या संगीतकारांची जोडी असून, या दोघांनी मिळून अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केलेलं आहे.
दरम्यान, अंकिताने नुकतीच नवीन गाडी करत तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या घरी नवीन वर्षात ऑडी या कारचं आगमन झालेलं आहे. आता अंकिता व कुणाल लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.