रविवार, ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी ५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला असून उपविजेता अभिजीत सावंत ठरला आहे. तिसऱ्या स्थानावर निक्की तांबोळी, चौथ्या स्थानावर धनंजय पोवार तर पाचव्या स्थानावरून अंकिता वालावलकर घराबाहेर पडली होती. त्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता अंकिताने कलर्स मराठीने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाली अंकिता वालावलकर?
अंकिताने इन्स्टाग्रामवर कलर्स मराठीने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत प्रेक्षकांसाठी लिहिले, “ट्रॉफी नाही पण तुमचं खूप प्रेम घेऊन बाहेर आले आहे. वोटमधून आणि इथे कमेंट मधील तुमच्या पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद आणि खूप प्रेम !”, असे म्हणत अंकिता वालावलकरने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
अंकिता वालावलकर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर ती कोकणहार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. ती बिग बॉसच्या घरात असताना तिला तिच्या चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. जेव्हा ती पाचव्या स्थानावरून घराबाहेर पडली तेव्हा प्रेक्षकांनी सोशल मीडियावर कमेंट करत आपले मत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
“अंकिताच आमच्यासाठी विजेता…”
अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी ‘अंकिताच आमच्यासाठी विजेता आहे’, असे म्हटले. काहींनी बिग बॉसचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. तर अनेक प्रेक्षकांनी अंकिता टॉप ३ मध्ये असायला पाहिजे होती, असे म्हणत तिला आपला पाठिंबा दर्शवला. एका नेटकऱ्याने, “अंकिता तू आमचं मन जिंकलंस”, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “जनतेसाठी अंकिता विजेता आहे, असे म्हटले आहे.
हेही वाचा: Selfie With भाऊ! रितेश देशमुखने सूरज अन् ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह शेअर केला पहिला फोटो, म्हणाला…
दरम्यान, ७० दिवसात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.