कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यामध्ये कधी सोशल मीडियावरील रील, तर कधी यूट्यूबवर शेअर करण्यात येणारे व्हिडीओंचा समावेश असतो. या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. ‘बिग बॉस मराठी ५’फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरपैकी एक असल्याचे पाहायला मिळते. कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर ही सध्या तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

अंकिता वालावलकर नेमकं काय म्हणाली?

अंकिता वालावलकरने यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, आज आम्ही कार द्यायला चाललो आहे. या गाडीतील माझा शेवटचा प्रवास आहे. माझी यूट्यूब जर्नी या गाडीपासून सुरुवात झाली. अंकिताबरोबर तिचा होणारा नवरा कुणाल भगतदेखील तिच्याबरोबर असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कार देण्यासाठी जाताना अंकिता भावूक होत रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिता भावूक झाल्यानंतर कुणालने तिची समजूत घातल्याचेदेखील दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये अंकिताने कार विकण्याचे कारण सांगितले आहे. तिने म्हटलेय की, खरं तर ही कार मी कधीच विकणार नव्हते. सगळ्या गोष्टींचा विचार करता, मी हा निर्णय घेतला. दुसरी गाडी घ्यायची विचार होता म्हणून ही गाडी विकली. याच गाडीतून मी मालवणी गजालींना सुरुवात केली होती. त्याला छान प्रतिसादही मिळाला. बऱ्याच गोष्टींच्या आठवणी त्या गाडीबरोबर होत्या म्हणून मला रडायला आलं. ती गाडी देताना खूप वाईट वाटलं. असं नाहीये की, आता परवडत नाहीये म्हणून विकली वगैरे तर असं काही नाहीये. मला नवीन गाडी घ्यायची आहे; पण मी दोन-तीन गाड्यांमध्ये कन्फ्युज आहे.

अंकिताच्या या व्हिडीओमध्ये तिच्या घरी धनंजय पोवारदेखील आल्याचे पाहायला मिळाले. अंकिता व धनंजय पोवार हे दोघेही बिग बॉस मराठी ५ च्या घरात सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरातील ही बहीण-भावाची जोडी बाहेरच्या जगातही तितकीच एकमेकांना साथ देत असल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा: Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो

आता अंकिता कोणती नवीन कार घेणार आणि कधी घेणार, याची चाहत्यांना उत्सुकता असल्याचे कमेंट्सवरून पाहायला मिळत आहे.

Story img Loader