Ankita Walawalkar & Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या महाअंतिम सोहळ्यात म्हणजे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दिग्दर्शक केदार शिंदेंनी मोठी घोषणा केली होती. सूरज चव्हाणला विजेता घोषित केल्यावर त्यांनी लवकरच सूरजला घेऊन नवीन सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय त्या सिनेमाचं नाव ‘झापुक झुपूक’ असेल असंही दिग्दर्शिकांनी तेव्हाच सांगितलं होतं.
आता केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाची पहिली झलक टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. या सिनेमात सूरज चव्हाणचा जीवनप्रवास त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय हिरोची मुख्य भूमिका सुद्धा सूरज स्वत: साकारणार आहे. त्यामुळे, या सिनेमाची ‘गुलीगत किंग’चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
सूरज चव्हाणची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रत्येकाशी चांगली मैत्री झाली होती. यापैकी अंकिता वालावलकर सूरजला भाऊ मानायची. आपल्या भावाच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित होताच अंकिताने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. सूरजच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं आणि अंकिताचं खास कनेक्शन आहे. हे कनेक्शन म्हणजे, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमासाठी अंकिताचा नवरा कुणाल व त्याचा पार्टनर करण हे दोघे मिळून संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे.
नवऱ्याने दिलेलं संगीत आणि भावाच्या चित्रपटाचा टीझर आल्यावर अंकिताने खास पोस्ट शेअर केली आहे. सूरज चव्हाणबद्दल कोकण हार्टेड गर्ल लिहिते, “कडक ना भावा…मार्केट गाजव अख्ख्यांना नाचव” तसेच, ‘गुलीगत म्युझिक रे नवऱ्या’ असं म्हणत अंकिताने दोघांचंही कौतुक केलं आहे.
केदार शिंदे, कुणाल-करण, सना शिंदे आणि संपूर्ण ‘झापुक झुपूक’ टीमला अंकिताने या पोस्टमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरजने प्रसिद्धी मिळवत आपली माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.