Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून घराघरांत लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकर यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. शोमध्ये पहिल्या दिवसापासून तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. मूळची कोकणातली अंकिता २०१६ मध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी मुंबईत आली. आता बघता बघता ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ सोशल मीडियाची स्टार झाली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात ‘फॅमिली वीक टास्क’मध्ये अंकिताला भेटण्यासाठी तिचे बाबा खास कोकणातून आले होते. त्यांनी लाडक्या लेकीसाठी पहिल्यांदाच मुंबईचा प्रवास केला. यानंतर शो संपल्यावर आता अंकिता केव्हा सिंधुदुर्गात जाणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच ‘कोकण हार्टेड गर्ल’ने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यात “तू अजून तुझ्या आईला भेटण्यासाठी मालवणला का नाही गेलीस?” असा प्रश्न अंकिताला तिच्या एका चाहत्याने विचारला. याला सविस्तर उत्तर देताना अंकिताने कोकणात केव्हा जाणार याची तारीख देखील सांगितली आहे.
अंकिता कोकणात का नाही गेली?
अंकिता म्हणते, “मला घरी जायचंय पण, दिवाळीत आमचा हॅम्परचा बिझनेस असतो आणि त्यासाठी बरीच खरेदी करायची होती. ती शॉपिंग सध्या सुरू आहे. त्या सगळ्या गोष्टी मी इथून सिंधुदुर्गात पाठवतेय…त्यामुळे सध्या प्रचंड धावपळ सुरू आहे. येत्या २१ तारखेला कोकणात जातेय आणि आता मी बरेच दिवस राहणार आहे. मला अनेकांनी संपर्क केला की, रॅली काढायचीये वगैरे…पण, या सगळ्यासाठी मी नकार दिला आहे. मी सर्वांना सिंधुदुर्गात जाऊन भेटेन.”
“मला माझ्या आई-बाबांना सुद्धा भेटायचंय. पण, बिझनेसमध्ये आता लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण, यामध्ये ७० दिवसांचा गॅप होता. त्यात आता दिवाळी येतेय…त्यामुळे सगळ्या ऑर्डर वगैरे आता सुरू आहेत. वेळच नाहीये…पण मी २१ तारखेला निक्की सिंधुदुर्गात जाणार आहे.” असं अंकिताने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अंकिता वालावलकर वैयक्तिक आयुष्यात आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘कोकण हार्डेट गर्ल’ने होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.