Ankita Walwalkar Wedding : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथे थाटामाटात पार पडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता अंकिता आणि कुणाल साता जन्माचे सोबती झालेले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अंकिता वालावलकर घराघरांत लोकप्रिय झाली. तिला ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’ अशी नवीन ओळख मिळाली. शोमध्ये असतानाच तिने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने कुणालबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. केळवण, मेहंदी, साखरपुडा, संगीत असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर अंकिता व कुणाल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेल्या काही सदस्यांनी देखील उपस्थिती लावली होती.

धनंजय पोवार म्हणजेच कोल्हापूरचा ‘डीपी दादा’ अंकिताला आपली लहान बहीण मानतो. त्यामुळे, “लग्नाच्या तयारीला पहिल्या दिवसापासून मी हजर असेन” असं त्याने आधीच सांगितलं होतं. डीपी, त्याची पत्नी, आई-बाबा, मुलं असे सगळे अंकिताच्या लग्नासाठी कोकणात पोहोचले होते. याशिवाय पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, योगिताचा नवरा सौरभ चौघुले, पुरुषोत्तम दादा पाटील ही सगळी मंडळी अंकिताच्या लग्नाला उपस्थित होती. या सगळ्यांचे एकत्र फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये सूरज आणि अभिजीत का नाही आले असे प्रश्न विचारले आहेत. कारण, अंकिताने काही महिन्यांपूर्वीच सूरजला तिच्या लग्नाची तारीख सांगून निमंत्रित केलं होतं.

अंकिताला दोन्ही बहिणी आहेत. त्यामुळे डीपीने अंकिताच्या मोठ्या भावाची जबाबदारी तिच्या लग्नात पार पडली. अंकिताच्या दोन्ही बहि‍णींनी कुणालचा कान पिळलाच पण, डीपीने सुद्धा एक मोठा भाऊ म्हणून कुणालचा कान पिळला व बहिणीची काळजी घे असं त्याला सांगितलं.

सध्या संपूर्ण कलाविश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगतबद्दल सांगायचं झालं. तर तो मुळचा शहापूर अलिबागचा आहे. या दोघांची भेट ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला झाली होती. कुणालने करणच्या साथीने ‘येक नंबर या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. याशिवाय ‘लक्ष्मी निवास’, ‘तुला जपणार आहे’ या मालिकांच्या शीर्षक गीतांना सुद्धा कुणालने संगीत दिलेलं आहे.

Story img Loader